पुणे : हैद्राबाद येथील तिघा जणांनी विश्वास संपादन करुन तांदुळ खरेदी केला. त्या पैसे न देता प्रसिद्ध जयराज आणि कंपनीला ३८ लाख ३४ हजार ३०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हसनेन मछलीवाला, इब्राहिम मोहम्मद आणि मोहम्मद खाजा मोईनुद्दीन (सर्व रा. हैद्राबाद, तेलंगणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धवल राजेश शहा (वय ३९, रा. आर्दशनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ फेब्रुवारी २०२० ते आजपर्यंतच्या काळात घडला.
शहा यांची मार्केटयार्ड येथे जयराज आणि कंपनी हे घाऊक विक्रीचे दुकान आहे. त्यांचा तांदळाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार आहे. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून ३८ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा तांदुळ खरेदी केला. त्यानंतर त्याचे पैसे परत न करता विश्वासघात केला. त्यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यावरही त्यांनी पैसे न दिल्याने शेवटी त्यांनी फसवणूकीची फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दाबेराव अधिक तपास करत आहेत.