पुणे: पुण्यातील क्लाइन मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (cliene memorial english school bibwewadi pune) निवेदन घेऊन गेलेल्या पालकांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक फी आणि इतर मागण्यांसंदर्भात निवेदन घेऊन गेले होते. त्यावेळी शाळेतील खासगी बाऊन्सरने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी पालकांकडून बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर एक महिला बाऊन्सर आणि दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळावी याचे निवेदन घेऊन काही पालक 9 मार्चला शाळेत गेले होते. निवेदन स्वीकारल्याची पोचपावती पालकांना दिली नव्हती. "शाळेच्या मुख्याध्यापिकांनीही भेटण्यासाठी आलेल्या पालकांना भेटण्यास नकार दिला. यावेळी गेटवरील काही खाजगी बाऊन्सरनी पालकांवर दादागिरी केली" असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. यासंबंधीचा व्हिडीओ देखील समोर आला असून यामध्ये खाजगी बाऊन्सर पालकांशी अरेरावी करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल झाला आहे.
पालकांचे म्हणणे काय आहे?सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हीडिओतील एक पालक म्हणत आहे की, "गव्हर्नमेंटच्या जीआरप्रमाणे ट्युशन फी मध्ये 15 टक्क्यांची सवलत मिळावी हा लेखी अर्ज घेऊन आम्ही 9 तारखेला शाळेत गेलो होतो. शाळेने त्याच्यावर पोच म्हणून सही शिक्का द्यावा असं म्हंटल्यावर, अजिबात याची दखल घेतली गेली नाही. तर शाळेच्या प्रिन्सिपलने केबिनमध्ये बसून दोन बाऊन्सर पाठवले.
नंतर एका लेडीज बाउन्सरने पुरुष पालकांना मारहाण करत आम्हाला सर्वांना तिथून हाकलण्यात आलं. बाऊन्सरला विचारलं असता त्यांनी वरून आम्हाला ऑर्डर आहे असं सांगत आम्हाला बाहेर काढलं. या शाळेत गेली दहा वर्ष माझा मुलगा शिकत आहे. अशा शाळेत आम्हाला जर ही वागणूक मिळत असेल तर हे मोठं लज्जास्पद कृत्य आहे."
शाळेची प्रतिक्रिया काय?
शाळेच्या प्राचार्य सुनंदा सिंग म्हणाल्या, पालकांचे निवेदन दोन दिवसांपूर्वी फायनान्स विभागाने स्वीकारले होते. त्यांना निवेदन स्विकारल्याची पोहचही दिली होती. मात्र, त्यावर मुख्याध्यापकांचीच स्वाक्षरी हवी म्हणून ते अडून बसले. गेल्या वर्षांपासून पालकांनी विद्यार्थ्यांचे शुल्क भरले नाही. तरी सुद्धा शाळेने विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या आहेत. तसेच 15 टक्के शुल्क अनुदानाबाबतचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असून याबाबत सध्या निर्णय होऊ शकत शकत नाही. लेडी बाउन्सरला मारहाण व शिवीगाळ झाली ती सिक्युरिटी ऑफिसर आहे.पालक मोठ्या संख्येने शाळेत येत असल्याने सिक्युरिटी गार्ड ठेवले आहेत.