बारामती : बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील नीरा नदीवरील बंधारा जिलेटिनचा वापर करून फोडल्याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. फलटण पोलिसांनी गुरुवारी रात्री दोघांना अटक केली आहे. मंगळवारी (दि. २६) पहाटे जिलेटिनचा स्फोट केल्याने येथील बंधाऱ्याच्या तीन मोऱ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. १०० टक्के भरलेल्या बंधाऱ्यातून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आदेश हनुमंत तावरे (वय २७), अभिजित अशोक तावरे (वय २६, दोघे रा. सांगवी, ता. बारामती) या दोघां आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २९) दोघां आरोपींना फलटण न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्या दोघांना दि. १ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून वाळू व्यवसाय करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले. या संशयातूनच दोघां आरोपींना फलटण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या दोघांनी हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास देखील सुरू आहे. बंधारा उद्ध्वस्त करण्यासाठी जिलेटिनचा स्फोट केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी मध्यस्था मार्फत जिलेटिन मिळवून त्याचा स्फोट घडवून आणला आहे. त्या मध्यस्थाचा शोध पोलीस घेत आहेत.या दोघां आरोपींच्या इतर साथीदारांचाही पोलीस शोध घेणार आहेत. हा तपास कसून करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी तातडीने अटक करण्यात आलेल्या दोघांचे अहवाल फलटण पोलिसांकडून मागविले आहेत. हा अहवाल मिळाल्यानंतर आरोपींवर वाळू उपसा प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळू शकेल. या दोघांवर परिसरात वाळू उपशाचे गुन्हे दाखल असल्याबाबत अहवाल मिळाल्यानंतर चाचपणी करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस प्रशासनाला बेकायदेशीर वाळू व्यावसायिकांची यादी देण्यात येणार आहे. (वार्ताहर)४जिलेटिनचा स्फोट घडवून आणल्यानंतर १०० टक्के भरलेल्या बंधाऱ्याच्या तीन मोऱ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या मोऱ्यांमधून ३२ दशलक्ष घनफूट पाणी वाया गेले आहे. फोडण्यात आलेला बंधाऱ्याचा भाग फलटण पोलिसांच्या हद्दीत येतो. त्यामुळे पाटबंधारे खात्याने फलटण पोलिसांकडे तक्रार केली आहे. फलटण पोलिसांनी तातडीने हालचाली करून ४८ तासात आरोपींना पकडले आहे.४गुरूवार (दि. २८) पासून महसूल प्रशासनाने वाळू व्यवसायावर छापासत्र सुरू केले आहे. हे छापासत्र कायम सुरू राहणार आहे. येथील वाळू व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात येईल. दोषींवर देखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.