पुणे : शहरातील पानपट्टा असाेत किंवा दुभाजक, पान, गुटखा खाऊन लाल केलेले असतात. त्यातच अनेकजण वाहनचालविताना देखील रस्त्यावर थुंकून रस्ता घाण करत असतात. वास्तविकतः महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. आता या रस्त्यावर थुंकणाऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी इडंस बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनाेखी शक्कल लढवली आहेत. रस्त्यावर थुंकू नका अशी जनजागृती करत हे तरुण पानपट्टीचालकांना पेपरचे छाेटे बाॅक्स देत आहेत. जे नागरिक रस्तावर थुंकतात त्यांना त्या बाॅक्समध्ये थुंकून ते बाॅक्स कचरापेटीत टाकण्याचे आवाहन करत आहेत.
पुणे महापालिकेकडून रस्त्यावर न थुंकण्याबाबत वेळाेवेळी जागृती करण्यात येते, तरीही अनेक समाजकंटक रस्त्यावरच थुंकत असतात. पुण्यातील वाकड येथील इडंस बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अनाेखी शक्कल लढवली आहे. आठवड्यातील एक दिवस हे विद्यार्थी शहरातील विविध पानपट्ट्यांवर जात गाण गात रस्त्यावर न थुकण्याचे आवाहन करत आहेत. त्याचबराेबर या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले कागदाचे बाॅक्स नागरिकांना वाटण्यात येत असून रस्त्यावर न थुंकता या बाॅक्समध्ये थुंकण्याचे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर माेळक यांची या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. या विद्यार्थ्यांचे माेळक यांनी काैतुक केले. तसेच्या त्यांच्या कामाला प्राेत्साहन दिेले. माेळक म्हणाले, हे विद्यार्थी गाण्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहेत. तसेच नागरिकांना त्यांनी तयार केलेले कागदाचे बाॅक्स देत आहेत. तसेच त्या बाॅक्समध्ये थुंकून ते बाॅक्स कचरा पेटीत टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आठवड्यातील एक दिवस हे विद्यार्थी शहरातील विविध भागात जनजागृती करतात.