धनकवडी (पुणे) : उच्चदाब वीजवाहिनीबाबत सुरक्षा न घेतल्याने तिचा धक्का लागून एका १४ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी महावितरणच्या कात्रज विभागाचे अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवलिंग शरणप्पा बोरे असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.
ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील बलकवडे नगर येथील ओमकार सोसायटी येथे २३ ऑक्टोबर रोजी घडली होती. याबाबत मंजुनाथ पुजारी (वय ५७, रा. कर्वेनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश मंजुनाथ पुजारी (वय १४) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज कोंढवा रोडवरील ओमकार सोसायटीतील गार्डनमध्ये महावितरणची उच्चदाब वाहिनी जमिनीपासून ४ फुटांवर लोंबकळत होती. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्याची महावितरणकडून दखल घेण्यात आली नाही.
दरम्यान, मंजुनाथ पुजारी हे कामानिमित्त कात्रजला आले होते. त्यांच्यासोबत मुलगा ऋषिकेशही आला होता. ऋषिकेश हा इयत्ता नववीमध्ये शिकत होता. घटनेच्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने तो वडिलांसोबत आला होता. वडील काम करत असताना तो खालीच खेळत होता. खेळताना त्याचा चेंडू गार्डनमध्ये गेल्याने तो आणण्यासाठी ऋषिकेश गेला. त्यावेळी त्याला या वीजवाहिनीचा धक्का बसून त्यात तो भाजला. रुग्णालयात उपचारानंतर त्याचा ३० ऑक्टोबर २०२२ रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.
दरम्यान, विजेच्या वाहिनीचा धक्का लागून त्यात ऋषिकेश पुजारी याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.