निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून मुलाला बोअरवेलमधून सुखरुप काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुलाला वाचविण्यासाठी एन. डी. आर. एफ.च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असून दुपारच्या सुमारास रस्त्याचे काम करीत असताना मुलगा आई-वडिलांची नजर चुकवून त्या ठिकाणी खेळत असताना ही घटना घडली. ज्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडला तो बोअरवेल सुमारे २०० फूट खोल आहे.सुदैवाने मुलगा १० ते १५ फूट खोलीवर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा मुलगा रवी मूळचा शेगावचा असून रवीचे आई-वडील रोडवर मजुरीने काम करतात. मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुलाला सुखरूप वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्नसुरू आहेत. परिसरातील नागरिकांना ही घटना समजल्यापासून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे.