पुणे : खेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने सध्या मुलांचे खेळ रंगले आहेत. असाच खेळ सुरू असताना बॉल जेसीबी मशीनमध्ये गेल्याने सार्थक लिंबोने या मुलगा मशीनवर चढला.हा प्रकार जेसीबी मालकाच्या लक्षात आल्यावर त्याने सार्थकला समजवून असे करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक होते. मात्र तसे काहीही न होता त्याने सार्थकला जेसीबीच्या पुढे माती उपसण्यासाठी असलेल्या बजेटमध्ये बसवून मशीन सुरू केले. या प्रकाराने घाबरलेल्या सार्थकने आरडाओरडा केला. मात्र तरीही निष्ठुरपणे त्याच्या रडण्याचे चित्रीकरण करत हा प्रकार सुरूच होता. घाबरलेल्या सार्थकने दोन दिवस हा प्रकार घरी सांगितला नाही. अखेर दोन दिवसांनी हा प्रकार उजेडात आल्यावर नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.महापालिकेने नाला साफ करण्याऐवजी आमच्या मुलांना त्यात टाकण्याचे टेंडर काढले आहे का असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.दरम्यान या जेसीबी मालकावर अजून तरी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
जेसीबी मशीनमध्ये चढणाऱ्या मुलाला अमानुषपणे घाबरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:45 PM