रस्ता नसल्याने डिस्चार्ज मिळालेल्या आईसाठी डोली करून मुलगा ३० किलोमीटर अंतर चालला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:12 PM2021-03-16T15:12:52+5:302021-03-16T15:38:44+5:30
दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर रस्ता नसल्याने आईला डोली करून नेण्याची वेळ...
राजेंद्र रणखांबे -
मार्गासनी : पुणे जिल्ह्यात अद्यापही काही गावे अशी आहे की, त्याठिकाणी रस्ते, वीज, पाणी या जीवनावश्यक सुविधा
पोहचलेल्या नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी जीवतोड संघर्ष करावा लागतो आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. आईला आपल्या गावी घरी नेण्यासाठी मुलाने आणि एका नातेवाईकाने डोंगर कड्या कपारीतुन ३० किलोमीटरचे खडतर अंतर पार करत डोलीवरून घोल या गावात पोहचवले. अतिशय खडतर प्रवास लीलयापार केल्यामुळे गावात आल्यानंतर परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील चांदर हे गाव दऱ्या खोऱ्यांच्या मध्यभागी व दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी वसलेले आहे. स्वातंत्र्यानंतर अद्यापही या गावात कोणताही रस्ता झालेला नाही. त्यामुळे गावात दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही.गावातून एसटीसाठी जायचे झाल्यास डोंगर चढुन तीन तासांच्या प्रवासानंतर एसटीच्या थांब्यावर पोहचता येते. गावातील बारकाबाई लक्ष्मण सांगळे (वय ६०) ह्या आजारी पडल्या. पुणे शहराकडे येण्यासाठी तीन तास चालणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा बाळासाहेब लक्ष्मण सांगळे व दीर मारुती सांगळे यांनी तिला महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर आजीला घरी सोडले. त्यावेळी मुलगा व दीर यांनी रायगड किल्ल्याच्या डोंगर रांगामधुन तिला उन्हा-तान्हात पायपीट करत कधी थांबत तर कधी थोडीसी विश्रांती घेत डोलीमधुन आपल्या मूळ गावी चांदर येथे आणले.
सह्याद्रीच्या डोंगर रांगा या परिसरात असुन किल्ले रायगड,किल्ले लिंगाणा असे अवघड गड देखील याच भागात आहेत.उंच उंच भिंतीसारखे याठिकाणी मोठ मोठे कडे आहेत.केवळ वाऱ्याची झुळुकच या कडी कपारीतुन जाऊ शकते. प्राणी व मानव या अवघड वाटेतुन जाऊ शकत नाही.जाताना वाटेत खुप मोठे जंगल येते. या जंगलात रानटी जनावर देखील आहेत.बिबट्याचे,दर्शन या परिसरात ग्रामस्थांना नेहमीच घडत असते. तरीदेखील आजीच्या इच्छेसाठी मुलाने व दिराने या अवघड वाटेतुन तब्बल तीस किलोमीटर प्रवास करत डोलीमधुन आजीला गावी सुखरुप आणले. आधुनिक युगात मुले आईवडिलांना अनाथ आश्रमात पाठवतात.पण याच युगात अजुनदेखील श्रावणबाळ जिवंत आहे. जे आईने व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रचंड खडतर प्रवास करतात.
आजीला आपल्या गावी घरी नेण्यासाठी आजीच्या मुलाचा व दिरांचा डोंगर कड्या कपारीतुन जीवघेणा प्रवास करीत घोल या गावात पोहचवले. अतिशय खडतर प्रवास या दोघांनी यशस्वीरित्या पार केला. गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी मुलाचे व दिराचे कौतुक केले.
माझ्या आईची एकच इच्छा होती की, मला माझ्या गावात मरण आले पाहिजे.त्यासाठी तिला महाड येथुन डोंगर दऱ्यांमधून डोलीकरून मूळ गावी चांदर येथे आणले.
- बाळासाहेब सांगळे, मुलगा.
....
गावामध्ये दळणवळणाचे कोणतेही साधन नाही तसेच आरोग्यसेवेसाठी पुण्यापेक्षा महाडला जाण्यास आम्हाला सोयीस्कर आहे. डोंगर दऱ्यातील पायवाटेने महाडला जाता येते.बारकाबाईला दवाखान्यातुन सोडल्यानंतर तिच्या इच्छेप्रमाणे गावात आणले.
- मारुती सांगळे, दीर