लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या १९ गावांमधील १४ गावांनी निवडणुकीवरील बहिष्कार कायम ठेवला. ५ गावांमध्ये मोजक्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून तेही आपले अर्ज मागे घेतील, अशी शक्यता आहे.महापालिका हद्दीत एकूण ३४ गावांचा समावेश करण्याबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात लेखी दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना १२ जूनपर्यंत त्याचा सविस्तर तपशील द्यायचा आहे. दरम्यान या ३४ पैकी १९ गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. ती थांबवणे शक्य नसल्याने या गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.त्याप्रमाणे १४ गावांनी आपला बहिष्कार कायम ठेवला, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशीपर्यंत एकही उमेदवारी अर्ज या गावांमध्ये दाखल झाला नाही. नांदेड, कोपरे, उंड्री, पिसुळी, आंबेगाव या ५ गावांमध्ये मात्र काहीजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र ते बहिष्काराचा निर्णय घेण्यापूर्वी आॅनलाईन दाखल करण्यात आले होते. बैठक घेऊन ते अर्ज १७ मे पर्यंत मागे घेतले जातील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
चौदा गावांचा बहिष्कार, ५ गावांमध्ये अर्ज दाखल
By admin | Published: May 13, 2017 4:47 AM