पुणे: पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांनी मंगळवारच्या बैठकीवर बहिष्कार घातला. समितीचे अध्यक्ष हेमंत रासनेच बैठकीला हजर होते. उर्वरित सर्व सदस्य अनुपस्थित राहिल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या वित्तीय समितीने मान्य केलेला ३० टक्के निधी न देता फसवणूक केल्याचा आरोप करीत स्थायी समितीच्या सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली.
पालिकेची वित्तीय समिती रद्द करण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी या समितीची आवश्यकता नसल्याचे नमूद करीत ही समिती रद्द करण्याची मागणी केली होती. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सभेपुढे समितीच्या आवश्यकतेबाबत निवेदन करावे लागले होते. कोरोनामुळे मागील दीड वर्षपासून पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पालिकेचे उत्पन्न कमी झाल्याने विकासकामांवर मर्यादा आल्या आहेत.
आगामी वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका असल्याने नगरसेवकांकडून प्रभागातील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी होत आहे. वित्तीय समितीने 'स' यादीच्या ३० टक्के निधी देण्याचे मान्य केले होते. स्थायी समिती सदस्यांनीही याविषयी भूमिका घेतली होती.दर मंगळवारी स्थायी समितीची बैठक होते. या बैठकीला समिती सदस्यांसोबत सर्व अधिकारी उपस्थित असतात. या बैठकीमध्ये निविदांना मंजुरी देण्याचे महत्वाचे निर्णय घेतले जातात.
मात्र, वित्तीय समितीने फसवणूक केली असे म्हणत समिती सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे महत्वाचे निर्णय आणि निविदाना मंजुरी मिळू शकली नाही. एकटे अध्यक्ष हेमंत रासनेच बैठकीला पोचले होते. त्याचा परिणाम मंगळवारी होत असलेल्या सर्वसाधारण सभेवर होणार आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांनी दिलेले 'दाखल-मान्य' विषय मान्य न झाल्याने सर्वसाधारण सभेसमोर येऊ शकणार नसल्याने अनेकजण हवालदिल झाले आहेत.