पुणे/किरण शिंदे : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. या वादाचा फटका दोन राज्यादरम्यान सुरू असणाऱ्या बससेवेला बसला आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केल्यानंतर महाराष्ट्रातही कर्नाटक राज्याच्या वाहनांना लक्ष केले जात आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून पुण्यात निषेध करत कर्नाटकला जाणाऱ्या बस गाड्यांना काळे फासण्यात आले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अनोख्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केलाय.
कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून इडली सांबार आणि मसाला डोसा या दक्षिणात्य पदार्थावर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी महापौर अंकुश काकडे यांनी सांगितले. वाडेश्वर कट्ट्यावर त्यांनी आज ही घोषणा केली. विविध क्षेत्रातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी वाडेश्वर कट्टा ओळखला जातो. अंकुश काकडे यांच्या पुढाकाराने हा कट्टा भरवला जातो.
अंकुश काकडे म्हणाले, कर्नाटक राज्यातील अनेक नागरिक महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करतात. महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीवावर ते मोठे झाले आहेत. मात्र कर्नाटक सरकार मराठी माणसाचा कशाप्रकारे द्वेष करत आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही हा बहिष्कार टाकला आहे. मात्र दक्षिणात्य पदार्थावर बहिष्कार टाकला असला तरीही कर्नाटकातील हॉटेल व्यवसायिक, व्यापाऱ्यांना किंवा नागरिकांना त्रास देण्याचा यामागे हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील वाद संपत नाही तोपर्यंत हा बहिष्कार असेल असेही त्यांनी सांगितले.