पुणे : प्रेयसीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून तिच्या पाच वर्षाच्या मुलाचे प्रियकराने अपहरण केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करुन अवघ्या ३ तासात या प्रियकराला पकडून मुलाची सुखरुप सुटका केली.
स्वप्नील रमेश शिंदे (वय २७, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. बाणेर येथील अल्पवयीन मुलाच्या अपहरणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत ही कारवाई केली. बाणेरमधील मुलाची सुटका झाली असली तरी अद्याप अपहरणकर्त्याचा शोध लागू शकला नाही. स्वप्नील हा वाहनचालक म्हणून काम करतो. तो मूळचा तुळजापूर येथील असून, आई-वडिलांसोबत राहतो.
याबाबत पोलीस उपायुक्त् नम्रता पाटील यांनी माहिती दिली. फिर्यादी महिला पाच वर्षाच्या मुलासह बिबबेवाडी येथील शनी मंदिर परिसरात वास्तव्याला आहे. ती कर्वेनगर येथील एका मॉलमध्ये हाऊस किपींगचे काम करते. तिचा घटस्फोट झाल्यापासून सुमारे ३ वर्षांपासून ती मुलासह एकटीच राहते. तिचे ८ महिन्यांपूर्वी स्वप्नीलबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तेव्हापासून तो तिच्या घरी राहतो. स्वप्नील तिला मारहाण करायचा. त्यांच्यामध्ये ३१ जानेवारी रोजी भांडण झाल्याने फिर्यादी महिला मुलासह भावाच्या घरी राहण्यास गेली होती.
यातील फिर्यादी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कामाला गेल्या. त्या कामावर असताना स्वप्नील शिंदे याने फोन करून ‘तुला व तुझ्या मुलाला मारून टाकतो’, अशी धमकी दिली होती. फिर्यादीला रात्री पावणे आठच्या सुमारास तिच्या भावाचा फोन आला. त्याने तुझ्या मुलाला दोघांनी फिरवून आणतो, असे सांगुन दुचाकीवरून कुठेतरी घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.
बिबवेवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन गाडीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपी कोंढवा परिसरात एका रिक्षात मुलासह पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या पथकाला सापडला. त्याने वादातून मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, निरीक्षक अनिता हिवरकर, सहाय्यक निरीक्षक प्रवीण काळोखे, कर्मचारी अमित पुजारी, तानाजी सागर, सतीश मोरे, अतुल मांगडे, देवकाते व देशमाने यांच्या पथकाने केली.