पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन पीएमपीएमएलकडून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. या सेवेला भाविकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून मागील पाच दिवसांत पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नाने दीड कोटीचा टप्पा गाठला आहे, तर जादा बसेसमुळे पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात प्रतिदिन १६ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली असून शेवटच्या तीन दिवसांत या उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.गणेशोत्सवासाठी शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांच्यासाठी पीएमपीकडून जादा बसेसचे नियोजन केले जाते. विशेषत: रात्री दहानंतर या बसेस असतात. या वर्षी प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपीने सुमारे ६२२ जादा बसेस तैनात केल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रवाशांची गर्दी आणि त्यांची मागणी लक्षात घेऊन शहरातील प्रमुख १३ डेपोंमधून या बसेस सोडण्यात येत आहेत. पीएमपीकडून या जादा बसेस सुरू करण्यापूर्वी दरदिवशी सुमारे १ कोटी ४५ लाखांपर्यंत दैनंदिन उत्पन्न होते. मात्र, ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत हे उत्पन्न सुमारे १ कोटी ५५ लाखांच्या घरात पोहोचले आहे, तर गणेशोत्सवाचे आणखी काही दिवस शिल्लक असून या उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून गरजेनुसार गाड्यांची संख्या वाढविली जाणार आहे. (प्रतिनिधी)वाहतूक पोलिसांचीही साथ गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील वाहतूक नियोजनासठी वाहतूक पोलिसांनी अनेक रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे हे रस्ते पीएमपीसाठीही बंद करून गाड्यांचा मार्ग बदलण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला होता. मात्र, इतर वाहने बंद असल्यास पीएमपीचा नागरिकांना फायदाच होणार असल्याने मार्गात बदल केले जाऊ नयेत, अशी मागणी पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्याकडे केली होती. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अगदी नगण्य स्वरूपात मार्ग बदलले आहेत. त्याच हातभारही पीएमपीच्या उत्पन्नवाढीस लागला आहे.
पीएमपीला बाप्प्पा पावला
By admin | Published: September 13, 2016 1:39 AM