पुणे : राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून निषेध करण्यता आला. पुण्यातील सावरकर स्मारक येथे सकाळी आंदाेलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यवर टीका करताना भारत आता मेक इन इंडिया नाहीतर रेप इन इंडिया झाले असल्याचे म्हंटले हाेते. या वक्तव्याबाबत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून लाेकसभेत करण्यात आली हाेती. दिल्लीत भारत बचाव आंदाेलन काॅंग्रेसकडून आयाेजित करण्यात आले हाेते. त्यावेळी त्यांनी ''मी माफी मागणार नाही, माझे नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी'' आहे असे वक्तव्य केले हाेते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून जाेरदार हल्ला चढविण्यात आला.
राहुल गांधींच्या याच वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून आंदाेलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या विराेधात घाेषणा देण्यात आल्या. तसेच गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाेलताना महासंघाचे मयुरेश अरगडे म्हणाले, मागील काही वर्षांपासून राहुल गांधी बेताल वक्तव्य करत आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. राहुल गांधी कधीच सावरकर हाेऊ शकत नाहीत. त्यांची तेवढी पात्रता देखील नाही. त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने ते क्रांतीविराला राजकारणात ओढत आहेत. आमची मागणी आहे की राहुल गांधी यांनी माफी मागावी.
राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्यांचा आम्ही निषेध करताे. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले हाेते की सावरकरांबाबत काेणी अपशब्द काढल्यास आम्ही त्यांना चाैकात झाेडू. त्यामुळे हीच अपेक्षा आम्हाला शिवसेनेकडून आहे. मुख्यंमत्र्यांनी आमचा निषेध पाेहचवावा.