पुणे : ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘ब्राम्हण लोक स्वत: चे पोट भरण्यासाठी दशक्रिया विधी करतात’ अशी खोचक टिप्पणी करीत ब्राम्हणांसह हिंदू धर्मालाच टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. यासंदर्भात महासंघाचे पदाधिकारी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना भेटून निवेदन देणार आहेत तसेच चित्रपटगृहाच्या मालकांना हा चित्रपट प्रदर्शित करू नये असेही महासंघाच्या वतीने सांगण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून, संदीप पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे पुरस्कार देखील मिळाले आहेत. येत्या शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदू धर्मातील दशक्रिया विधींसह एकूणच प्रथा, परंपरेवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्याने त्यातील आक्षेपार्ह मुद्यांवरच ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे.
‘सातत्याने ब्राम्हण आणि विशेषत: हिंदू धर्माच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम सुरू आहे. आता चित्रपटांमधूनही त्यांना लक्ष्य केले जात आहे. बाजीराव पेशवे यांनी पुण्यात बसून सात राज्यांवर राज्य केले, त्यांची बायको मस्तानी अशी भर सभेत नाचेल का? हिंदू धर्मातील इतिहासाचे विकृतीकरण करण्याचाच हा भाग आहे, जे कदापि सहन केले जाणार नाही. ब्राह्मणांसह सगळे हिंदू सॉफ्ट टार्गेट आहेत. काहीही केले तरी खपवून घेऊ असे वाटत असल्यानेच हे प्रकार होत आहेत. ब्राम्हण जातीतील कुणाही व्यक्तीचे निधन झाले की त्यांच्या पश्चात विधी करण्याची पद्धत आहे. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. - आनंद दवे, अध्यक्ष, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ
मी ‘दशक्रिया’ ही कादंबरी २२ वर्षांपूर्वी लिहिली आहे. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये या कादंबरीचा समावेश करण्यात आला असून, या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. कादंबरीमध्ये ब्राम्हणांवर टीका करण्यात आलेली नाही. केवळ मानवी प्रवृत्तींविरोधात भाष्य करण्यात आले आहे. मुळात चित्रपटाला विरोध करणार्यांनी हा चित्रपट पाहिला आहे का? या चित्रपटात काय मांडल आहे ते आधी प्रेक्षकांसह विरोधकांनी पाहावे अशी कळकळीची विनंती मी करतो.- बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक