- राजू इनामदार
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेसभवनमध्ये सोमवारची सायंकाळ विशेष ठरली. येथे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या प्रमुखांमध्ये राजकीय चर्चा झाली. मात्र, हीच संवादभेट दोन्ही संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण करणारी ठरली. या राजकीय वादंगानंतरही दोन्ही संघटनांचे प्रमुख मात्र यात काहीही गैर नाही यावर ठाम आहेत.
अशी झाली भेट
ब्राह्मण महासंघाला काँग्रेसभवनमधूनच भेटीचे निमंत्रण गेले होते. चहापानाला म्हणून बोलावण्यात आले होते. त्यानुसार महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे सोमवारी सायंकाळी काँग्रेसभवनमध्ये गेले. संघटनेचे विश्वस्त मनोज तारे, चैतन्य जोशी, संजय देशमुख, आशिष पेंढारकर हे देखील त्यांच्यासमवेत होते. ते काँग्रेसभवनात आल्यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत माजी आमदार दीप्ती चौधरी, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस संगीता तिवारी, अल्पसंख्याक आघाडीचे रफिक शेखदेखील होते.
काेण काय म्हणाले?
- काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसचा हिंदूंना कधीही विरोध नाही. काँग्रेसचे सर्वोच्च नेते व राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वत: धर्म मानणारेच होते. मात्र, धार्मिक मांडणी, जातीयवाद, दंगेधोपे हे काँग्रेसला मान्य नाही. वैयक्तिक स्वरूपात सगळेच धर्म मानणारे असतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात समाजस्तरावर विचार करताना धार्मिक विचार करून चालणार नाही हीच काँग्रेसची विचारधारा आहे. सर्वच धर्म शांततेचा मार्ग सांगतात. आम्ही दवे यांना महात्मा गांधीजींची प्रतिमा भेट दिली आहे.
- ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, ‘‘हिंदूंचा किंवा ब्राह्मणांचाही काँग्रेसला कधीही विरोध नव्हता व नाही. उलटपक्षी काँग्रेसचे बहुसंख्य नेते ब्राह्मणच होते. सध्या काहीजणांकडून गांधी, नेहरूंना जसे दुर्लक्षित केले जातेय ते सर्वसामान्य हिंदूंना मान्य नाही. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सोरटी सोमनाथ मंदिराचा जीणोद्धार केला, पंडित नेहरूंनी अनेक विज्ञानवादी संस्था स्थापन केल्या. ज्याचा सर्वाधिक उपयोग ब्राह्मण समाजाला झाला. अयोध्येतील राम मंदिराचे कुलूपही राजीव गांधी यांनीच उघडले, हे आम्हाला विसरता येणार नाही. महात्मा गांधीजींची प्रतिमा मी आमच्या कार्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेशेजारी ठेवली आहे.’’
विरोध करणारे म्हणतात...
- दोन्ही संघटनांमधील या भेटीला विरोध असणारे खुलेपणाने काहीच बोलायला तयार नाहीत; मात्र काँग्रेसमधील विरोधकांचे म्हणणे आहे की, हिंदुत्ववादाबाबत कायम आग्रही असणाऱ्यांना कशासाठी बोलावले? का म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा करायची? काँग्रेसची विचारधारा निधर्मी आहे. असे असताना असंगाबरोबर संग का करायचा?
- ब्राह्मण समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, स्थापनेपासून एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण, हिंदू समाजाला तुच्छ लेखणाऱ्यांबरोबर कशासाठी बसायचे? आता राजकीय दृष्ट्या अडचणीत आहेत म्हणून त्यांना ब्राह्मण समाजाबरोबर बोलावेसे वाटते, आपण त्याला कशासाठी बळी पडायचे?
शहराध्यक्ष म्हणून मी फक्त ब्राह्मण संघटनांनाच नाही, तर सर्वच समाजातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसभवनमध्ये निमंत्रित करणार आहे. त्यांच्याबरोबर चर्चा व्हावी, असे माझे मत आहे. काँग्रेस नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा विचार करते. त्याच्याशी जुळणारा हा उपक्रम आहे. त्यांचे म्हणणे काय आहे, आपले म्हणणे काय आहे, हे चर्चेशिवाय समजणारच नाही, म्हणून ही चर्चा आहे.
- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
निमंत्रण नाकारून ताठपणा का दाखवायचा? तिथे गेलो याचा अर्थ आम्ही आमचे विचार सोडून दिले, असा होत नाही. अशा भेटी म्हणजे आमचे म्हणणे काय आहे हे सांगण्याची संधी असते. लवकरच आम्ही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेणार आहोत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही संघटनेच्या वतीने भेट घेतली. मला यात काहीही गैर वाटत नाही.
- आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ