एकात्मिक क्षेपणास्त्रांच्या विकासाचा कार्यक्रमातून अंतर्गत पृथ्वी आणि अग्नी या क्षेपणास्त्राचा विकास करण्यात आला. तसेच स्वनातीत वेगाने उडणाऱ्या क्षेपणास्त्राचे आरेखनही करण्यास भारतीय शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. मात्र, यासाठी लागणाऱ्या स्क्रॅम जेट इंजिनाचे तंत्रज्ञान भारताकडे नव्हते. यामुळे एकात्मिक दीर्घकालील कार्यक्रमांतर्गत या क्षेपणास्त्र विकासाठी रशियाची मदत घेण्याचे ठरले. सोव्हियत रशियाने या क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. मात्र, सोव्हियत संघाचे विघटन झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या रशियाला क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम पुढे नेता आला नाही. भारतीय शास्त्रज्ञांनी या प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या विकासाची संकल्पना रशियन शास्त्रज्ञांपुढे मांडली. रशियन शास्त्रज्ञांनाही भारतीय शास्त्रज्ञांची ही संकल्पना आवडली आणि दोन्ही देशांच्या संयुक्त माध्यमातून या क्षेपणास्त्राच्या विकास करण्याचे ठरवले. या साठी भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियाची एन.पी.ओ.एम या संस्थांनी एकत्र येत ५ डिसेंबर १९९५ ला एकत्र येत ब्राह्मोस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निर्मिती करत या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. येथूनच ब्राह्मोसच्या निर्मितीचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. अतिशय गुप्त पद्धतीने या क्षेपणास्त्राचा विकास दोन्ही देशांतील तंत्रज्ञानी सुरू केला. हा प्रवास विविध प्रकरणात पिल्लई यांनी मांडला आहे. ब्राह्मोस हे नाव कसे ठेवले गेले ? या प्रकल्पात दोन्ही देशांच्या संकृती, बलशाली इतिहासाचे दर्शन घडेल याचाही विचार करण्यात आला आहे. याचे विस्तृत विवेचन रोमांचक आहे. एक एक आव्हानांना तोंड देत १२ जून २००१ ला या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी झाली.
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विकासासोबतच या पुस्तकात लेखकाने जगातील सर्वक्षेपणास्त्र विकासाचीही माहिती दिली आहे. यामुळे या विषयाशी संबंध नसणाऱ्यांनाही हे पुस्तक वाचून भारतीय क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाबरोबरच इतर देशांच्या क्षेपणास्त्राची माहिती मिळते. क्षेपणास्त्रात वापरण्यात येणाऱ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक संज्ञा या अतिशय क्लिष्ट असतात. त्या सर्वसामान्यांना समजणे कठीण असतात. या सर्व संज्ञा पुस्तकात विविध प्रकरणात स्वतंत्रपणे मांडल्या आहेत. अनुवादक अभय सदावर्ते यांनी सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून मूळ इंग्रजीत असलेल्या या सर्व संकल्पना अतिशय ओघवत्या आणि समजेल अशा भाषेत त्या विषद केल्या आहेत. यामुळे ब्राह्मोसचा विकास हा पुस्तकाच्या पुढेही सोप्या पद्धतीने वाचकांपुडे उलगडत जातो. हा सर्व प्रवास वाचताना वाचकांच्या एक विलक्षण अनुभूती देऊन जातो.
- निनाद देशमुख