पुणे : सायकलींचे शहर म्हणून असलेली ओळख पुसून पुणे दुचाकींचे शहर बनले. तर मागील काही वर्षांत पुणे जिल्ह्याने ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणून नवी ओळख निर्माण केली. पण कोरोना संकटाने मागील चार-पाच महिने या उद्योगाला मोठा फटका सहन करावा लागला. पण ऑक्टोबर महिन्यानंतर वाहनांची विक्री या उद्योगाला पुन्हा उभारी मिळत असल्याचे सुचिन्ह आहे.
मागील वर्षी वाहन उद्योग मंदीच्या सावटाखाली होता. या वर्षाच्या सुरूवातीला वाहन विक्री वाढत असल्याचे चिन्ह असतानाच कोरोनाचे संकट आले. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वाहन विक्री बंद करण्यात आली. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीने विक्री सुरू झाली. पण शहरात कोरोनाचा कहर कायम असल्याने तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.
लॉकडाऊनपुर्वी दर महिन्याला २० ते २२ हजार वाहनांची विक्री होत होती. लॉकडाऊनमध्ये ऑगस्ट महिन्यात दहा हजारांचा टप्पा ओलांडला गेला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्याने २१ हजार वाहनांची विक्री झाल्याने हा व्यवसाय पूर्ववत होत असल्याचे दिसून आले. त्यातही दुचाकींच्या तुलनेत चारचाकी वाहनांची विक्री अधिक झाल्याचे आढळून येते. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दीड लाखाने वाहन विक्रीत घट झाली आहे.
२०२० मध्ये वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी बीएस-फोर मानक असलेल्या वाहनांची विक्री १ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही वाहने ३१ मार्चपर्यंत नोंदणी करून विक्री करणे बंधनकारक होते. आधीच मंदीमुळे वाहन विक्री अपेक्षेप्रमाणे न झाल्याने बीएस फोर वाहनांची विक्री करण्याचे आव्हान वाहन कंपन्यांसमोर होते. मार्च महिन्यात शेवटचा आठवडा लॉकडाऊनमध्ये गेल्याने त्याचा फटकाही उद्योगाला बसला. एकुणच यंदाचे वर्ष वाहन विक्रीबाबत निराशाजनकच राहिले.
---------
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली
२०१८ मध्ये ४८६ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. २०१९ मध्ये हा आकडा १००४ पर्यंत पोहचला तर यावर्षी लॉकडाऊनचा काळ वगळून ऑक्टोबरपर्यंत सुमारे ९२५ चा आकडा पार झाला आहे. सीएनजी वाहनांची विक्रीही मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास तिपटीने वाढली आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत १३३६ वाहनांची नोंद झाली आहे. तुलनेने पेट्रोल व डिझेलवरील वाहनांची विक्री जवळपास दीड पटीने कमी झाली आहे.
------------
वाहन विक्रीची स्थिती (एप्रिल ते नोव्हेंबर)
२०१९ - ३,४३,०७६
२०२० - १,६५,०२६
----------