अॅड.जयदेव गायकवाड ज्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करतात असे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनातील एक उतुुंग व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पवार. वयाच्या ७५ व्या वर्षातही ते तरुणांना लाजवतात. एवढे गतीमान, क्रियाशील आणि कार्यमग्न. गेली ५० वर्षे त्यांनी सतत महाराष्ट्राच्या भल्याचा विचार पुढे ठेऊन त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग केला. महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री म्हणून काम करीत असताना वा केंद्रियमंत्री म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्र राज्याला सतत प्रागतिक राज्य म्हणून सन्मान मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला तसाच महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकटावर मात करताना त्यांनी अत्यंत जिद्दीने सत्तेचा वापर केला व संकटग्रस्तांना सुरक्षितता मिळवून दिली. किल्लारीचा भूकंप, मुंबईची दंगल, झालेले बॉम्ब स्फोट, विस्कटलेले व भयग्रस्त असुरक्षित लोकांना आपल्या अलौकिक सामर्थ्याने पुन: पूर्वरत जगण्याचे सामर्थ्य दिले. गेले तीन चार वर्षात महाराष्ट्रात मराठवाड्यात विर्दभात पावसाची अवकृपा आहे. कधी अवर्षण, तर कधी अवकाळी ढगफुटी होतेय. नापिकी वा आलेली पिक उध्वस्त होतात. तेव्हा शेतकऱ्यांना जगविण्याची शासनाची जबाबदारी आहे, हा विचार निग्रहाने मांडणारे पवार नैसर्गिक संकटाची चाहुल लागताच शेतकऱ्यांच्या संकटात त्यांना दिलासा देताना दिसतात आणि सत्तेत असो वा नसो शासनकर्त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आग्रही आवाहन करतात. खरे तर पवार साहेब हे गेली ५०, ५५ वर्षे अहर्निशपणे हे सर्व करत आहेत. त्यांचे विचार, चिंतन, अभ्यास आणि अनुभवाचा महाराष्ट्राने उपयोग केला पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. परत क्लेश होतात जेव्हा राज्यकर्त्यांकडून त्यांच्या सुचना, मार्गदर्शनाचा विचार न करता त्यात त्यांचे राजकारण पाहिले जाते व विरोधाकरिता विरोध केला जातो. यशवंतराव चव्हाणानंतर राष्ट्रीय स्तरावरचे ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांना देशात ओळखले जाते. एका छोट्या पक्षाचे नेतृत्व करीत असले तरी त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, मुत्स्द्दीपणा राजकीय धुरीधर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या भारताला आहे. लोकनेता, जाणता राजा,जाएंट मराठा लिडर म्हणून कधी पोवड्यातून त्यांचे वर्णन केले जाते. परंतु अलिकडेच त्यांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी स्टेट्समन पक्षातील दृष्टे नेते किंवा बेस्ट प्राईम मिनीस्टर इंडिया नेव्हर हॅड असे जे वर्णन केले ते मनाला खूप भावले. मात्र त्या पैकी बेस्ट प्राईम मिनीस्टर इंडिया नेव्हर हॅड या काव्यातील शेवटचे म्हणणे, ‘इंडिया नेव्हार हॅड या मताशी सहमत व्हायला एक मन तयार नाही. कारण साहेब हे एक मूर्तीमंत आश्चर्य आहे, ते शारीरिक दृष्ट्या ७५ वर्षाचे झाले असतील परंतु म्हणून ते म्हतारे झाले वा वय त्यांच्या विरोधात गेले असे नव्हे ते मिरॅकल करु शकतात. जशी त्यांनी कॅन्सरवर मात केली, अँजिओप्लास्टी झाली नी दुसऱ्या दिवशी काम सुरु. अलिकडे खुबा मोडला त्याही काळात त्यावर मात करून चालू लागले. साहेब मोडून पडणारे नाहीत. अजूनही आगामी भविष्याची आम्ही वाट पाहत आहोत. पवार साहेबांचे आचरणही एक वेगळ््या प्रकारे लक्षात ठेवावे असे आहे. त्यांचे राजकारण, राजकीय डावपेच भल्याभल्यांना ओळखता येत नाहीत किंवा कळत नाहीत. आजही त्यांच्या राजकीय खेळ्या अनाकलिय अतर्क्यच असतात. त्यांच्या राजकीय खेळ्या हा चर्चेचा विषय असतो. त्यांनी खेळी केलेल्या गोष्टींचा निरनिराळ्या अंगाने विचार करावा लागतो. त्या बाबत अनेक तर्क लढविले जातात. उदा. गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मागितला नसतानाही साहेबांनी भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. त्यानंतर उठलेले वादळ आणि लढवलेले तर्क आजही निश्चित अर्थ लावता येत नाही. भाजपाची अवस्था अशी झाली की, पाठिंबा घेणे शक्य नव्हते की नकार देणे ही शक्य नव्हते. सेनेला चेक बसला तरीही सरकार झाले, परंतु कधी फुटेल याचा नेम नाही असे चालत राहिलेच पुढे काय होईल कुणीच भाकित करु शकत नाही. राष्ट्रवादीच्या धुरीणांनाही ही खेळी अत्यंत वेगळी वाटलेली आहे. खरे तर पवार साहेबांच्या अनेक खेळ्या आम्हालाच खटकतात. ज्या मोदींनी पवारांवर धुंवाधार टिका केली त्या मोदींना पवार बारामतीत का बोलवतात त्यांच्याकडून स्तुती करुन का घेतात...! खरे तर हा प्रश्न आमचा पाठलाग करीतच राहतो. साहेब अशा प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. त्यामुळे त्या घटनेचे गुढ तसेच राहाते. लोक तर्क विर्तक करीत राहतात मग कधी वाटते, साहेबांनी एकदा पुर्ण ताकदीनिशी पुढे व्हावे आणि देशातला सर्व डाव्या परिवर्तनवादी वा धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर द्यावे नी राजकारणाला एकदा नवीन वळण द्यावे... एकदा.
ब्रेव्ह हार्ट....!
By admin | Published: December 12, 2015 12:37 AM