पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखान्यातर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत ब्राझिलच्या लॉरा पिगोस्सी हिने युक्रेनच्या मारियाना झकारल्यूकचा पराभव करून विजेतेपद मिळवले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीच्या सामन्यात ब्राझिलच्या तिसऱ्या मानांकित लौरा पिगोस्सी हिने पाचव्या मानांकित युक्रेनच्या मारियाना झकारल्युकचा टायब्रेकमध्ये तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना दोन तास ३७ मिनिटे चालला.
पहिला सेट अवघ्या २६ मिनिटात घेत लॉराने मारियानावर निर्विवाद वर्चस्व राखले. या सेटमध्ये लॉराने पहिल्याच गेमला मारियानाची सर्व्हिस रोखली. लॉराची आक्रमक खेळी व बिनतोड सर्व्हिससमोर मारियानाची खेळी निष्प्रभ ठरली. लॉराने मारियानाची तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट एकतर्फी जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या मारियानाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार कमबॅक केले. तिने लॉराची दुसऱ्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात आघाडी घेतली.
मारियानाने आपली आघाडी कायम ठेवत चौथ्या गेममध्ये लॉराची पुन्हा सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-३ असा जिंकून सामन्यातील आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मारियानाने सुरुवातीला वेगवान खेळ केला. मारियानाने पहिल्या, तिसऱ्या सेटमध्ये लॉराची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर लॉराने नवीन रणनीती आखत आठव्या व दहाव्या गेममध्ये मारियानाची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये लौराने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व हा सेट ७-६ (५) असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला दोन लाख ८६ हजार रुपये आणि ५० डब्लूटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूला एक लाख ५४ हजार रुपये आणि ३० डब्लूटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सहसंस्थापक किशोर पाटील, एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखान्याचे मानद सचिव विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : एकेरी : अंतिम फेरी : महिला
लॉरा पिगोस्सी, ब्राझील (३) वि.वि. मारियाना झकारल्युक, युक्रेन (५) ६-०, ३-६, ७-६ (५)