---
लोणी काळभोर : राज्य सरकारच्या ‘ ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत सुरू झालेल्या दोन दिवसांच्या कडकडीत लॉकडावूनला पूर्व हवेलीत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडले नाही. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आढळून येत आहे.
उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीतील नागरिक शनिवार व रविवार या दोन दिवसांत नाहक घराबाहेर पडले तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा लोणी काळभोर पोलिसांचे कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी उपयायोजना म्हणून राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत शुक्रवार ९ एप्रिल सायंकाळी ६ ते सोमवार १२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत पुणे महानगरपालिकेप्रमाणेच शहरालगतच्या लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी लोणी काळभोर व लोणी कंंद पोलीस काटेकोरपणे करताना दिसत आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, उरूळी कांचन व इतर सर्व गावांत कडेकोट बंदोबस्त तैनात केला असल्याने गावांतून ये - जा करणाराना पोलीस चौकशीस सामोरे जावे लागले.
--
चौकट
अत्यावश्यक सेवेची तुरळक वर्दळ
मेडीकल व दूधविक्री दुकानांचा अपवाद वगळता सर्व दुकाने बंद दिसत होती. त्यातही दूधविक्रीची दुकाने सकाळी ६ ते ११ या कालावधीत सुरू होती. रुग्णवाहिका वगळता रिक्षा, बस, टॅक्सी याचबरोबर खासगी व सार्वजनिक वाहने रस्त्यावर दिसत नव्हती. मोठ्या गावांतील मुख्य चौकात पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेने एखादी दुचाकी अथवा चारचाकी वाहने रस्त्यावरून येताना दिसले तर संबंधितांना पोलीस कारवाईस सामोरे जावे लागत होते.
--
फोटो क्रमांक : १० लाेणी काळभोर ब्रेक द चेन
फोटो ओळी : रस्त्यावरून नाहक फिरत असलेल्यांची चौकशी करताना लोणी काळभोर पोलीस.