पुणे : बाळासाहेब थोरातांनी आमदार संग्राम थोपटे यांना काँग्रेसचे सरकार आले तर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये काँगेसकडून थोपटे यांना मंत्रिपद न देत तो पक्षाने शब्द पाळला नाही. एकीकडे नव्याने निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले गेले पण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या व पक्ष वाढविण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतलेल्या माणसाला मंत्रिपदापासून डावलण्यात आले. संयमाने मागणी करून न्याय मिळत नाही म्हटल्यावर थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसभवनात तोडफोड करत तुफान राडा घातला.
'एकच दादा संग्रामदादा' अशी घोषणाबाजी करत थोपटे समर्थकांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेसभवनाची तोडफोड केली. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद डावलल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते.
तोडफोड केल्यानंतर थोपटे यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद डावलल्यानंतर आम्ही प्रचंड नाराज झालो. आता आमच्या संयमाचा बांध फुटला आहे. सातत्याने थोपटे यांच्यावर पक्षाकडून अन्याय करण्यात आला आहे. काल जाहीर झालेल्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ संग्राम थोपटे यांना डावलले गेले.