लोकमत न्यूज नेटवर्क मंचर (जि. पुणे) : बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठल्यानंतर राज्यात आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शनिवारी पहिल्यांदा बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश काढत यात्रांवर बंदी घालत ही शर्यत रद्द करण्यास सांगितले. याचा शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी निषेध करीत बैलगाडा मालकांसमवेत सकाळी शर्यतीच्या घाटातच ठिय्या आंदोलन केले.
बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानंतर सर्वात प्रथम लांडेवाडी ग्रामस्थांनी शीतलादेवी यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज केला होता. सर्व पूर्तता झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेला परवानगी दिली होती. तब्बल २५० बैलगाडे शर्यतीत सहभागी होणार होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शर्यतीला स्थगिती दिल्याचा आदेश काढला.
प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. विरोध होऊ नये म्हणून रात्री हा निर्णय जाहीर करण्यात आला. ही शर्यत होऊ नये म्हणून षड्यंत्र रचले गेले, याचा मी निषेध करतो.- शिवाजीराव अढळराव पाटील, शिवसेना उपनेते
कोरोनामुळे राज्यावर आलेले संकट मोठे असून, बैलगाडा शर्यतीसारख्या कार्यक्रमांना मुरड घालायला हवी. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही.- अजित पवार, उपमुख्यमंत्री