याप्रकरणी विशाल नहार (वय ४०, रा. सिद्धार्थ अपार्टमेंट, गायकवाडनगर, औंध) यांनी चतु: शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. नहार कुटुंबीय शुक्रवारी (३० जुलै) सकाळी फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते घरी परतले. तेवढया वेळेत चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून कपाटातील १८ हजारांची रोकड आणि दागिने असा २ लाख ११ हजारांचा ऐवज लांबविला.
याच परिसरातील महावीर पार्क सोसायटी आणि चिंतामणीनगर को-ऑप सोसायटीतील २ फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे तपास करत आहेत. शहरात निर्बंध लागू असताना घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
.......
बतावणी करून घरफोडी
कोंढवा भागात चोरट्यांनी ८ वर्षांच्या मुलीकडे बतावणी करून कपाटातील ५० हजारांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुशीला विश्लावत (वय २३, रा. सोमजी चौक, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. विश्लावत दाम्पत्य सोमजी चौकातील वाघ वस्तीत राहायला आहे. विश्लावत दाम्पत्य नोकरी करतात शुक्रवारी सकाळी दुचाकीवरुन एक चोरटा विश्लावत यांच्या घराजवळ आला. त्या वेळी विश्लावत यांची ८ वर्षांची मुलगी घरात एकटीच होती. चोरट्याने बतावणी मुलीकडे बतावणी केली. आई-वडिलांनी घरातून काही वस्तू आणण्यास सांगितल्या आहेत, असे चोरट्याने मुलीला सांगितले. कपाटातील दागिने घेऊन चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करत आहेत.