आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील कार्तिकीवारी तथा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कोरोनामुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित संपन्न होत आहे. यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे पालन केले जात आहे. यापार्श्वभूमीवर आळंदीतील पान, फुले, हार, प्रसाद विक्री, पेढे, खेळणी, पूजेचे साहित्य व इतर व्यवसाय बंद राहणार असल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
आषाढी व कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदी शहराचा आर्थिक कणा मानला जातो. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे माऊलींचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मंदिर परिसरातील व्यवसाय ठप्प होऊन अर्थकारण ठप्प झाले होते. दुकानातील माल टाकून देण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. दरम्यान दिवाळीत मंदिरे खुले करण्याचा आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आला. त्यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी व्यावसायिकांनी सुरुवात केली. सध्या सुरू असलेल्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी दुकानदारांनी नव्याने माल भरला. मात्र, यात्रा कालावधीत संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर पुन्हा दुकाने बंद करण्यात आल्याने दुकानातील संपूर्ण माल वाया जाण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.
दरम्यान आठ दिवसीय कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. या आठ दिवसाच्या यात्रेत आळंदीत बहुतांशी सर्वच व्यावसायिकांची लाखोंची उलाढाल होत असते. परंतु यंदा कोरोनाच्या महामारीमुळे हे आर्थिक चक्र बंद पडले आहे.
चौकट.................
तीर्थक्षेत्र आळंदीत संजीवन समाधी मंदिराच्या आजुबाजूला दोनशेहून अधिक छोटी - मोठी दुकाने आहेत. यामध्ये पाने-फुले, प्रसाद, हार, खेळणी, तुळशीच्या माळा आदी वस्तू विक्री केल्या जातात. व्यावसायिकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून अर्थकारण बंद आहे. त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, हप्ते, व्याज त्याचबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह हे सारे अर्थकारण करायचे कसे? असा गंभीर प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.
मानाच्या तिनही दिंड्या एकादशीला येणार आळंदीत
कार्तिकी वारीसाठी शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या तीन दिंड्या एकादशीच्या दिवशी (दि.११) आळंदीत एसटीने दाखल होणार आहेत. पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह येणार आहेत.
फोटो
०९ आळंदी यात्रा
तीर्थक्षेत्र आळंदीत संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली दुकाने. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)