राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाला पुन्हा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:15 PM2018-06-16T21:15:30+5:302018-06-16T21:15:30+5:30
पक्षाच्या विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लगेचच शहराध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केली होती.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याचा पुन्हा एकदा ब्रेक बसला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची नावे पक्षाने जाहीर केली असून पुणे शहराध्यक्षपदाचे नाव मात्र शिल्लक ठेवण्यात आले आहे. या पदासाठीची असलेली मोठी स्पर्धा आता कमी झाली असूनही नाव जाहीर न केल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.
पक्षाच्या विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लगेचच शहराध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केली होती. खासदारकीच्या कामाकडे जास्त लक्ष द्यायचे असल्यामुळे तसेच सलग दोन वेळा शहराध्यक्षपदावर काम पाहिल्यामुळे आता त्या पदावरून मुक्त करावे असे त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवले होते. त्यादृष्टीने चर्चाही सुरू झाली. त्यात माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी गटनेते सुभाष जगताप, विद्यमान उपाध्यक्ष अशोक राठी तसेच वैशाली बनकर व अन्य काही माजी महिला महापौरांनी या पदावर काम करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे दर्शवली होती.
अजित पवार यांनी या नावांची चर्चा ऐकून घेऊन १० जूनला आपण नाव जाहीर करू असे जाहीरपणे सांगितले होते. दरम्यानच्या काळात मानकर एका प्रकरणात अडकले गेल्यामुळे सर्वच चर्चा थांबली व आता तर राज्यातील अन्य जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची नावे जाहीर केल्यानंतरही पुण्याचे नाव बाकी ठेवण्यात आले आहे. सुभाष जगताप यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असल्याचे बोलले जात आहे. प्रशांत जगताप उपनगरातील हडपसर, वानवडी परिसरातील आहेत. त्यांना नुकतेच महापौरपद देण्यात आले. तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते चेतन तुपे हेही त्याच परिसरातील आहेत. त्यामुळे एकाच भागात पदे द्यायला काहीजणांचा विरोध आहे.
मोठ्या नावांपेक्षाही संघटनात्मक पदांवर काम केलेल्यांवर ही जबाबदारी द्यावी अशी भूमिका खासदार वंदना चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली असल्याचे समजते. अशोक राठी हे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षसंघटनेत सक्रिय आहेत. त्यांनी हे पद आपल्याला द्यावे अशी मागणी पक्षाकडे केली आहे. वंदना चव्हाण या सलग आठ वर्षे या पदावर आहेत. त्यांना मुक्त करून त्या पदावर पुन्हा दुसºया महिलेला संधी कशी द्यायची असेही पक्षात बोलले जात आहे. यातून मार्ग काढून पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात की पुन्हा खासदार चव्हाण यांच्याकडेच ही जबाबदारी राहते याविषयी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता आहे.