पुणे: एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरणाची मागणी आता जोर पकडत आहे. रविवारी पुणे विभागांतील तीन डेपो बंद झाले. रविवारी मध्य रात्री 12 वाजल्यापासून काही डेपो बंद होऊन सोमवारी सकाळ पासून पुण्यातील एसटीसेवा बंद झाली आहे. कर्मचारी संघटनांनी याची नोटीस देखील एसटी प्रशासनाला दिली आहे. तर दुसरीकडे कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने सोमवारी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत कोणताही निर्णय होईल याची वाट न बघता कर्मचारी सोमवार पासून संपावर ठाम आहे. त्यामुळे सोमवार पासून पुण्यात एसटीच्या चाकांना ब्रेक लागणार असून स्वारगेट शिवाजीनगर सहित आणखी तीन डेपो बंद झाले आहेत.
स्वारगेट परिसरात सकाळापासून कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना माघारी फिरावे लागत आहे. स्वारगेट आगारातच कर्मचारी एसटी जागेवरच लावून आंदोलनाला बसले आहेत. शिवाजीनगर भागातही अशीच परिस्थिती असल्याचे चित्र सकाळी दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक आगारात कर्मचारी आत्महत्या करीत आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना बळजबरीने कामावर पाठविले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संघटना आता संपाच्या मानसिकतेत नव्हते. मात्र कर्मचाऱ्याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवीत कालच पुण्यातील राजगुरूनगर, नारायणगाव, व इंदापूर हे आगार बंद केले. त्यामुळे कृती समितीला देखील त्याची दखल घ्यावी लागली. कृती समितीने सोमवारी मुंबईत सर्व संघटनेच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे.
कर्मचारी का संतापले
दरवर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांची उचल (ऍडव्हान्स) मिळते.पण यंदा एसटी प्रशासनाने उचल दिली नाही. बोनस च्या नावाखाली केवळ अडीच हजार रुपये दिले. अडीच हजारात बोनस करायचे का ? हा प्रश्न कर्मचाऱ्यांला सतावला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी आर पार ची लढाई लढण्याचे असे ठरविले आहे.