पिंपरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या उत्पन्नास या आर्थिक वर्षात नोटाबंदीचा फटका बसला आहे. २०१५-१६ च्या तुलनेत या आर्थिक वर्षात तब्बल २३ लाखांनी आगाराचे उत्पन्न घटले आहे. राज्यातील विविध आगारांपैकी वल्लभनगर हे एक प्रमुख आगार समजले जाते. येथून राज्याच्या विविध भागात एसटी बस सुटतात. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी असून, शहरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग असून, हे कामगार राज्याच्या विविध भागांतून शहरात आलेले आहेत. त्यामुळे मूळ गावी जाण्यासाठी त्यांना एसटीने प्रवास करावा लागतो. एसटी बसमुळे प्रवाशांना दूर अंतरावर जाण्यासाठी मोठा फायदा होतो. या आगारातून राज्याच्या विविध भागात ४६ गाड्या सुटतात, तर इतर मार्गांवरील सुमारे दोनशे गाड्या डेपोतून जातात. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे वार्षिक उत्पन्नही चांगल्या प्रमाणात मिळते. मात्र, २०१६-१७ या आर्थिक वर्षात उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. तब्बल २२ लाखांनी उत्पन्न घटले आहे. वर्षातील १२ महिन्यांच्या कालावधीत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेबु्रवारी या महिन्यांमध्ये कमी उत्पन्न मिळाले आहे. नोव्हेंबर महिन्यात जुन्या नोटा बंद झाल्यानंतर प्रवासी संख्येवर परिणाम झाला. यामुळे उत्पन्नही घटले. २०१५-१६ या आर्थिक वर्षात वल्लभनगर आगाराला २७ कोटी ८ लाख १६ हजार इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा २६ कोटी ८५ लाख ४१ हजार इतके उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच मागील वर्षात त्याअगोदरच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २३ लाखांनी घट झाली आहे. एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. वल्लभनगर आगाराकडून नव्याने तीन मार्गांसाठी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरसाठी दिवसाला चार गाड्या सोडल्या जाणार आहेत. यासह लातूर आणि चिपळूण या मार्गावरील गाड्यांचाही समावेश आहे. एटीएममध्ये खडखडाट असल्याने रोख रक्कम मिळविणे कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांनी खर्चाला आळा घातला होता. अशाचप्रकारे अनेकांनी दूरचा प्रवासदेखील टाळला. याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर झाला. एसटी प्रवासावेळी जुन्या नोटा स्वीकारण्यास सवलत देण्यात आली होती. मात्र, तरीही त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही.(प्रतिनिधी)
नोटबंदीने एसटीच्या उत्पन्नाला लागला ‘ब्रेक’
By admin | Published: April 11, 2017 3:31 AM