पक्षाचे काहीही होऊ द्या, आमचे भागू द्या, अशी मक्तेदारी मोडून काढा; पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:04 IST2025-03-11T17:03:17+5:302025-03-11T17:04:34+5:30
आता पुणे शहरातील एक-दोन नाही तर सर्वच पदाधिकाऱ्यांना बदलावे, नव्या तरुण रक्ताला संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी

पक्षाचे काहीही होऊ द्या, आमचे भागू द्या, अशी मक्तेदारी मोडून काढा; पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
पुणे : आजी आमदार एकही नाही... एक नवा माजी आमदार होता तोही पक्ष सोडून चालला... मागील सलग तीन पंचवार्षिकमध्ये पक्षाला काहीही यश नाही, तरीही आमचे नेते काही शहाणे व्हायला तयार नाहीत... अशी शहरातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. एक-दोन नाही तर शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांना बदलावे, नव्या तरुण रक्ताला संधी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिल्लीपासून सगळीकडे काँग्रेसचा जोरदार धमाका करणारे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केला. मात्र, त्याबाबत स्थानिक नेत्यांच्या भावना ‘ना खंत, ना खेद’ अशा आहेत. तरुण, धडपणारे, संघर्ष करणारे अशी धंगेकर यांची प्रतिमा होती. मात्र, पक्षातील स्थानिक नेत्यांनी त्यांना कधीही सामावून घेतले नाही. त्यांच्या कोणत्याही आंदोलनात सहभाग घेतला नाही. पक्षाच्या कार्यक्रमात ते आमदार असूनही त्यांचे काहीवेळा छायाचित्र नाही, बैठकीची त्यांना निमंत्रणे नाही, असाच खोडसाळपणा त्यांच्या बाबतीत कायम केला गेला, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पक्ष जणू स्वत:ची खासगी मालमत्ता आहे, अशा पद्धतीने काम सुरू आहे. धंगेकर काय किंवा आम्ही त्यांचे कार्यकर्ते काय, आम्हाला अशा वर्तनाची सवय नाही. राहायचे तर स्वाभिमानाने नाही तर नाही, अशीच त्यांची व आमचीही वृत्ती आहे. त्यामुळेच आम्ही पक्षाला रामराम करतो आहोत, असे त्यांच्यातील काही जणांनी सांगितले.
सहनशक्तीचा कडेलोट झाला
खुद्द धंगेकर म्हणाले, माझा कोणत्याही नेत्यांवर राग नाही, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरही नाही, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवर तर नाहीच नाही. अल्पावधीतच पक्षाने मला पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. सर्वांच्या परिश्रमाने मी निवडून आलो. त्याचाच काही जुन्यांना त्रास झाला व त्यांनी लगेचच मला बाजूला कसे टाकता येईल, याची मोर्चेबांधणी सुरू केली. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र माझ्या कार्यकर्त्यांना याचा राग येत होता. शेवटी कोणीही राजकीय व्यक्ती मित्र, कार्यकर्ते यांच्या बळावरच मोठा होत असतो. त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यातून मग माझा निर्णय पक्का होत गेला.
मक्तेदारी मोडून काढा
काँग्रेसच्या नेत्यांना मात्र हे मान्य नाही तर दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मात्र मागील काही वर्षांत पक्षाची राजकीय पीछेहाट होण्यात नेतेच कारणीभूत आहेत, असे वाटते. आमदार असलेल्या कोणालाही दुय्यम वागणूक मिळाली तर त्यांना राग येणारच. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणत्या नेत्यांनी धंगेकर यांचा किती प्रचार केला, याचे राज्यातील नेत्यांनी एकदा ऑडिट करावे, म्हणजे त्यातून प्रत्यकाचा चेहरा समोर येईल, अशी भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पक्षाचे काहीही होऊ द्या, आमचे भागू द्या, अशा वृत्तीने काही जण काम करत आहेत. ही मक्तेदारी मोडून काढल्याशिवाय पक्षाला राजकीय यश मिळणार नाही, असे त्यांना वाटते.