पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, संभाजीनगरचं नामांतर झालं काय आणि न झालं काय, मी बोलतोय ना, अरे तू कोण? तू कुणी वल्लभ भाई पटेल आहे, की महात्मा गांधी? तू कोण आहे, मी बोलतोय ना? मी बोलतोय काय लॉजिक आहे? इतके दिवस केंद्रास सत्ता होती संभाजीनगरच्या नामांतराचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही. कारण तो निवडणुकीच्या दृष्टीने सतत जीवंत ठेवायचा आहे आणि त्यावरून मतं मिळवायची आहेत. अशा शब्दात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. याच वेळी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्याही केल्या.
राज ठाकरे म्हणाले, यांना संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून केवळ याच गोष्टी करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झाले, संभाजीनगर असे नाव झाले, की मग प्रश्नच मिटला. मग बोलायचे कशावर? राज्यात अनेक शहरांत १०-१० दिवस पाणी येत नाही. संभाजीनगरात येत नाही, जालन्यात येत नाही, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी येत नाही. ते विषयच नाही.
त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे समजत नाही. आमचं खरं हिंदूत्व, यांचं खोटं हिंदूत्व? तुम्ही काय वॉशिंग पावडर विकताय का? खरं हिंदुत्व काय आहे, याचे रिझल्ट पाहीजेल आहेत लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना आम्ही रिझल्ट देतो. आंदोलांसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मला सांगावे, की तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याची केस आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावर असेल किंवा हिंदूत्वाच्या प्रश्नावर, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही. ९२-९३ ला दंगल झाली एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरच फक्त सुरू, असेही राज म्हणाले.
पंतप्रधानांकडे राज यांच्या तीन मागण्यात -राज म्हणाले, मी मागे एका सभेत बोललो होतो, की पंतप्रधान मोदींना विनंती आहे, की या देशात त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. या देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठीही एक नवा कायदा आणावा आणि माझी तिसरी विनंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना, की या औरंगाबादचे लवकरात लवकर 'संभाजीनगर', असे नामांतर करून टाका आणि यांचे राजकारण एकदा मोडीतच काढा.
हेही वाचा -अयोध्या दौरा का रद्द केला? राज ठाकरेंनी भावना व्यक्त करत केला मोठा गौप्यस्फोट!
"शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर यापलीकडे काय बोलायचं?"; राज ठाकरेंचं टीकास्त्र