पुणे : वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करून गुंडगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एका वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सहकारनगर पोलिसांनी तयार केलेल्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी परवानगी देऊन ही कारवाई केली. मनोज ऊर्फ लल्ल्या ऊर्फ शंकर कांतिलाल कांबळे (वय २८, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे. कांबळे सराईत गुन्हेगार असून, हडपसर, कोंढवा, दत्तवाडी, खडक आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दहीमध्ये पिस्तुल, तलवार, कोयते, सुरा आदी घातक हत्यारे बाळगून दहशत माजवीत फिरत असतो. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, दरोड्याची तयारी असे गुन्हे दाखल आहेत. त्याने गेल्या १० महिन्यांत सातत्याने वाहनांची जाळपोळ करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा घातक शस्त्रे बाळगणे व लोकांकडून जबरदस्तीने पैसे गोळा करणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यापासून छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार, मोलमजुरी करणारे गरीब आणि सर्वसामान्य लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्यापासून जीविताला आणि मालमत्तेच्या नुकसानाचा धाक निर्माण झाला होता. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, निरीक्षक (गुन्हे) अप्पासाहेब वाघमळे यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला होता. हा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला. त्यानुसार कांबळे याची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
तोडफोड करणारा स्थानबद्ध
By admin | Published: October 14, 2016 4:49 AM