पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणेपोलिसांनी वाहतूकीबाबत एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) दुपारी ३ वाजल्याच्या नंतरपासून ३१ मार्चपर्यंत शहरात वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे. एका टिष्ट्वटला उत्तर देताना डॉ़ व्यंकटेशम यांनी ही माहिती दिली. कोरानाग्रस्तांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यापुर्वी पुणे शहरात अशा प्रकारे वाहतूक कधीही बंद झालेली नव्हती. दरम्यान, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे.
या बंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे अपर पोलीस डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले की, लोकांनी अनावश्यकपणे रस्त्यावर येऊ नये, यासाठी पोलीस व्हॅनमधून लोकांना आवाहन करीत आहोत. लोकांना जास्तीतजास्त घरात थांबावे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे.