बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक पाठोपाठ बारामती येथील ‘गोविंद बाग’ निवासस्थानी कोरोनाचा प्रवेश झाला आहे. गोविंद बागेतील चार शेती कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली. गोविंद बाग येथील शेती काम करणारे ३ पुरूष आणि एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
शुक्रवारी (दि. २१) शहर आणि तालुक्यातील एकूण ८ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या ४७० वर गेली आहे. त्यापैकी २४८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर १९७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रूई येथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बळीची संख्या २५ वर गेली आहे. गणेशोत्सवाला शनिवारी (दि. २२) सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी गणेश प्रतिष्ठापनाकरण्यासाठी मंडप उभारू नये, गणेश मुर्तीची स्थापना, मंदिर किंवा पक्क्या बांधकाम असलेल्या ठिकाणी करावी. गणेश मुर्तीची उंची ४ फुटांपेक्षा अधिकअसू नये. प्रतिष्ठापना तसेच विर्सजनाच्या वेळी मिरवणूक काढू नये,प्रतिष्ठापना करताना ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.———————————
उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत टाटा ट्रस्ट उभारणार 'कोविड केअर रुग्णालय'बारामती शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामतीत ७५ बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा, २५ बेडसाठी व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात १०० बेडसाठी ऑक्सिजन सुविधा, १५ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बारामतीत रूई येथील रुग्णालयासह २३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.