पुणे : जे अमराठी आहेत, तसेच ज्यांनी पूर्ण मुलाखत पाहिली नाही आणि केवळ ब्रेकिंग न्यूज पाहून प्रतिक्रिया देत आहेत तेच शरद पवारांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी 9 ते 11वाजताच्या दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, गांधीजींनी जो शांततेचा मार्ग सांगितला तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व या दोन्हीची सांगड घालत याची जाणीव आजच्या पिढीला करून देण्यासाठी आज आम्ही येथे शांततेत आंदोलन केले.सरकारने कर्ज माफी ची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष त्याचे लाभ शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सरकारमध्ये असणारे जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतात आणि त्यावर सरकार किंवा गृहमंत्रालयाने कुठलेही भाष्य केले नाही. आज सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थथा आहे. पेट्रोल डिझेल चे भाव वाढत आहेत. या सगळ्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.कोरेगाव भीमा प्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या ज्यांच्यावर आरोप नाहीत त्यांना नजरकैदेत ठेवलं जातं आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करायला हवा. मुठा कालवा उंदीर, घुशींमुळे फुटला असल्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर टीका करताना सुळे म्हणाल्या, जबाबदारी झटकून त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याची भाजपची पद्धत आहे. याबाबत आमच्या पक्षाने या आधीच भूमिका स्पष्ट केली आहे.
ब्रेकिंग न्यूज पाहणारेच पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 11:45 AM