Breaking: प्रत्येक ठिकाणी वेगळा नव्हे, आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:28 PM2021-04-10T13:28:40+5:302021-04-10T13:36:07+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यात राज्यासाठी निर्णय घेतला जाणार आहे.
बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिले.
बारामती येथे कोरोना आढावा बैठक शनिवारी (दि. १०) झाली. या बैठकीनंंतर पवार माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये इजेंक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली आहे. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल आज पुण्यात बैठक आहे.
पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. त्यामध्ये चर्चा होईल. तसेच या बैठकीमध्ये सोमवारपासून दुकाने उघडू द्या अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याबाबत देखील चर्चा होईल. याबाबत आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल. बारामतीत बैठक घेऊन इंजेक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. कोरोनाची होणारी रूग्णवाढ आपल्याला रोखायची आहे. त्यासाठी काही कठोर निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिस यंत्रणेने करावी, अशा सुचना दिल्या आहेत.
-------------------------
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद म्हणाले, राज्यासाठी ५० हजार रॅमिडिसेव्हर इंजेक्शन दिल्या जातात. त्यापैकी पुणे जिल्ह्याला ७ हजार मिळतात. तर ४५० बारामतीसाठी मिळतात. या इंजेक्शनच्या काळाबाजारा विषयी अद्याप एकही तक्रार आमच्याकडे नाही. पालकमंत्र्याच्या सूचनेप्रमणे १५ दिवस आधीच रेमिडिसिव्हरचा पुरेसा साठा खरेदी करून ठेवण्यात आला आहे. डिपीडिसी अंतर्गत शासकीय उपजिल्हा रूग्णालयांमध्ये रेमिडेसिव्हरचा कोणताही तुटवडा नाही. येथील रूग्णांना गरजेनुसार ते इंजेक्शन दिले जात आहे.
बारामती शहरातील १७ वार्डपैकी ५ वार्ड आणि तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. बारामतीमध्ये दररोज ७०० ते ८०० लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रूग्णसंख्या दिसून येत आहे. प्रशासन व्यवस्थित सर्व्हे करून आवश्यक लोकांच्या चाचण्या करत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रेट ३० टक्क्यांपर्यंत दिसून येत आहे.
कटेंन्मेंट झोन मध्ये कडक निर्बंध पाळणे गजेचे आहे. तरच रूग्णसंख्या कमी होईल असेही प्रसाद यावेळी म्हणाले.