डमी - १०८१
मोबाईलवर येणारे मेसेज न मिळाल्याने वाढतेय थकबाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील चौका-चौकात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंड आकारणी करण्यात येत असून, आतापर्यंत पुणे शहरात ई-चलनाद्वारे तब्बल ७७ कोटी ५२ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अनेकांना त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात आल्याचे मेसेज येतात. परंतु, ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच वाहनचालकांचा मोबाईल नंबर वेगळा आणि सध्या वापरात असलेला वेगळा मोबाईल असल्याने त्यांना ई-चलन मिळत नाही. त्यांच्यामुळे हा दंड साचत आहे.
ई-चलनाद्वारे दंड आकारणी केली जात असल्याने बहुतांश वाहनचालक हा दंड भरत नाही. जेव्हा केव्हा रस्त्यावर वाहतूक पोलीस पकडतात. त्यांच्या वाहनांवर किती दंड आहे, याची तपासणी करतात. तेव्हा मात्र त्यांना दंड भरण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळेच वाहतूक पोलिसांनी कितीही दंड आकारणी केली, तरी तो वसूल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाले आहे.
यावर्षी सीसीटीव्हीमार्फत ई-चलनाद्वारे ३१ जुलै २०२१ पर्यंत तब्बल ७७ कोटी ५२ लाख ५० हजार ५०० रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १० कोटी ४५ लाख ९८ हजार १०० रुपये दंड वसूल झाला आहे. गेल्या वर्षी ८० कोटी ८६ लाख ३६ हजार ९५३ रुपये दंड आकारणी करण्यात आली होती. त्यापैकी २१ कोटी ३२ लाख ३९ हजार ५३ रुपये दंडवसुली झाली आहे. हे प्रमाण २६.३७ टक्के इतके होते. या वर्षी हे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या वर्षातील काही दंडवसुली ही या वर्षात झाली आहे.
चौकट
असे फाडले जाते ई-चलन
शहरातील चौका-चौकांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. वाहतूक शाखेच्या येरवडा येथील नियंत्रण कक्षातून त्याद्वारे लक्ष ठेवण्यात येते. त्यात प्रामुख्याने विनाहेल्मेट, झेब्रा कॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा काही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तेथील पोलीस कर्मचारी कारवाई करतात. त्यांचा फोटो काढून वेळ, ठिकाण नोंदविला जातो. त्याद्वारे ही माहिती मुंबईतील मुख्य नियंत्रण कक्षाला कळविली जाते. तेथून संबंधित वाहनमालकावर ई-चलनाद्वारे दंड आकारणी केली जाते. त्याचा मेसेज संबंधितांच्या मोबाईलवर पाठविला जातो.
चौकट
मोबाईल ‘अपडेट’ केला का?
वाहन नोंदणीच्या वेळी आपल्याकडे त्यावेळी असलेला मोबाईल नंबर दिलेला असतो. त्यानंतर अनेक जण आपला मोबाईल बदलतात. मात्र, आरटीओकडे रजिस्टर केलेला मोबाईल नंबर बदलत नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या वाहनांवर दंड आकारणी झाली तर त्यांची माहिती जुन्या रजिस्टर मोबाईलवर जाते. बरेच वेळा जुने वाहन दुसऱ्याला विकतात. मात्र, त्याचे रजिस्ट्रेशन केले जात नाही. त्यामुळे नंतर जो वाहन वापरत असतो. त्याला दंडाची पावती न जाता जुन्या वाहनमालकालाच त्याची पावती जात असते.
चौकट
डुप्लिकेट नंबरप्लेट
शहरात अनेक जण डुप्लिकेट नंबर प्लेट लावून वाहन चालवित असल्याने दिसून आले आहे. त्यामुळे जर अशी बनावट नंबरप्लेट लावून वाहनचालकाने वाहतूक नियमांचा भंग केला, तर त्या वाहनचालकाला ई-चलन जाण्याऐवजी त्या नंबरचा जो वाहनमालक आहे. त्याला हे ई-चलन जाते. जेव्हा असे ई-चलन येते, तेव्हा त्या मूळ मालकाला आपल्या वाहनांची नंबरप्लेट लावून दुसराच एखादा वाहन फिरवत असल्याची माहिती होते.
चौकट
ई-चलनाद्वारे करण्यात आलेली दंड आकारणी
कालावधी एकूण दंड वसूल दंड
१ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ - ७७५२ ५०५०० १०४५९८१००
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० - ८०८६३६९५३ २१३२३९०५३