पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांचा शोधही न घेणाऱ्या काँग्रेसने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलणाऱ्या नगरसेवक व संघटना पदाधिकाऱ्यांवर मात्र सहा वर्षे निलंबनाची कुऱ्हाड उचलली आहे. चार विद्यमान नगरसेवक, दोन माजी नगरसेवक व अन्य काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्याखाली कारवाई करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. नगरसेवक अभिजित कदम, सुनंदा गडाळे, सुनीता गलांडे, रईस सुंडके अशी चार नगरसेवकांची नावे आहेत. प्रसन्न जगताप हे माजी उपमहापौर व माजी नगरसेवक असून, हरिदास चरवड पक्षाच्या चिटणीस पदावर होते. या पाच सदस्यांमधील अभिजित कदम यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे, परंतु पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही. कदम, गडाळे, चरवड गलांडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून, सुंडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. या सर्वांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फुटीरांना काँग्रेसची तंबी
By admin | Published: January 03, 2017 6:39 AM