जयवंत गंधाले
हडपसर : हडपसरमधील नगरसेवकांचे आपल्या परिसरावर असलेले प्रेमाचे ब्रेकअप झालेले दिसले. आय लव्ह ... पुढे परिसराचे नाव असणारे बोर्ड प्रशासनाकडे काढून टाकण्यात आले. त्यामुळे नागरिकांना महापालिकेत प्रशासकांची पॉवर काय असते हे समजले. आपल्या परिसरावर एवढी प्रेम करणारी ही नगरसेवक मंडळी आहेत की, परिसरातील नागरिकांनी फोन केला तर उचलण्यास किंवा त्यांच्या समस्या ऐकण्यास काही त्यांना वेळही नसतो.
काही नगरसेवक आपल्या संपर्क कार्यालयात लोकांना तासन्तास थांबून वाट पाहण्यास लावतात, तर काही नगरसेवक आपल्या ऑफिसमध्ये बसवून, येणाऱ्या माणसांना थांबवून ऑफिस बाहेर पाळीव प्राण्यांना खाद्य टाकण्याचे उद्योग करत असतात. अशा लोकप्रतिनिधींचे त्यांच्या प्रभागातील नागरिकांवर कसे प्रेम असेल. महापालिकेची परवानगी न घेता हे बोर्ड लावले. त्या बोर्डावर रात्रभर भल्ली मोठी लाईट लावली. त्या लाईटचे मागील सात-आठ महिन्यांचे बिल कोण भरणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.
पालिकेवर जर प्रशासक नसते तर हे बोर्ड उतरलेच नसते. मात्र, नगरसेवकांची कारकीर्द संपली आणि प्रशासकांना आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आता असे काही निर्णय लोकहिताचे झाले तर नागरिक आम्हाला नको नगरसेवक असे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. आयुक्त, सहायक आयुक्त यांनी जर मनात आणले आणि लोकहिताचे निर्णय घेतले तर वाहतुकीचा प्रश्न होणार नाही, अतिक्रमण राहणार नाही. राजकीय दबावापोटी नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे काही विनापरवाना कामे केली जातात. मात्र, नगरसेवकांचा प्रशासनावर दबाव येत असल्याने प्रशासनामधील अधिकाऱ्यांना काम करण्यास अडथळे येतात.
मात्र सध्याची परिस्थिती नगरसेवकांच्या हातात काहीच नसल्याने ही एक प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. या सुवर्णसंधीचा आपल्या बुद्धिमत्तेचा, अधिकाराचा वापर करून या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा देऊन समस्या सोडविल्यास नगरसेवकांचे पितळ उघडे पडेल हे नक्की.
अशी स्थानिक नागरिकांची इच्छा
स्थानिक नगरसेवक असल्याने होणाऱ्या विकासकामातील भ्रष्टाचार, त्या कामाची गुणवत्ता पाहण्यासाठी नागरिकांना पुढे येता येत नाही. नागरिकांवर नगरसेवक स्थानिक रहिवासी असल्याने दबाव असतो. तोच दबाव अधिकाऱ्यांवर असतो. त्यामुळे टेंडरमध्ये टक्केवारी मिळत असल्याने अनेक नगरसेवकांनी केलेल्या अशा विकासकामाचा बोजवारा उडालेली परिस्थिती लगेच नागरिकांसमोर दिसत असते. अधिकाऱ्यांचीही टक्केवारी असते. मात्र, अधिकाऱ्यांना नागरिक चांगले धारेवर धरू शकतात. त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्याची नागरिकांच्या मध्ये हिंमत आहे. मात्र, नगरसेवकांकडे स्थानिक लोकांची कामे असल्याने नगरसेवक मध्ये असल्यावर त्यांना अडचण येते. कामाला विरोध करता येत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या संधीचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगला वापर करून काही मूलभूत प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी इच्छा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत