पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत राज्यात ‘स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय येथे ब्रेस्ट क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे. आठवड्याच्या दर बुधवारी दुपारी १२ ते ०२ वाजेदरम्यान ब्रेस्ट क्लिनिक बाह्यरुग्ण विभाग चालू राहणार आहे. या बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
या कार्यक्रमास ससून सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती दासवाणी, स्तन कर्करोग तज्ज्ञ तथा नोडल ऑफिसर डॉ. मयुरी कांबळे, डॉ. अनंत बीडकर, डॉ. सचिन बळवंतकर व डॉ. किरण जाधव इ. उपस्थित होते. यादरम्यान, स्तन कर्करोगावर पथनाट्य व पोस्टरद्वारे सादरीकरण करण्यात आले. तसेच, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे या मोहिमेअंतर्गत मोबाईल युनिटची स्थापना करण्यात येणार असून, याद्वारे जनजागृती, प्रशिक्षण, तपासणी व संदर्भीय सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये विविध महाविद्यालये, सार्वजनिक संस्था, कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे इ. ठिकाणी जनजागृती माहिमा राबविल्या जातील. तसेच, स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होण्यासाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या गटाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
स्तन कर्करोगाचे निदान लवकर होईल
स्तन रोग क्लिनिकमुळे स्तन कर्करोगाचे निदान लवकर होईल, त्यामुळे रुग्णांस आधुनिक उपचार त्वरित व वेळेत मिळण्यास मदत होईल’ - डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
गरजू व गरीब रुग्णांस या योजनेमुळे फायदा
या स्तन कर्करोग मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजू व गरीब रुग्णांस या योजनेमुळे फायदा होईल व संभाव्य कर्करोगाचा धोका वेळीच टाळता येईल" - डॉ. मयूरी कांबळे, स्तन कर्करोग तज्ज्ञ, ससून रुग्णालय