लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : हायस्कूल परिसरात रोडरोमिओगिरी करीत शाळकरी मुलींना त्रास देणाऱ्या ३ मजनूंची १० ते १५ तरुणांनी एकत्र येत रात्रीच्या वेळेस धुलाई केली. धुलाई सुरू असताना आसपासच्या महिला आणि नागरिकांनी सोडविण्याऐवजी त्यांना मारण्यास प्रोत्साहन देत होते. मार खाणारे मजनू आणि मार देणाऱ्या कार्यकर्त्यांनी झालेला प्रकार पोलिसांत न जाता आपापसांत मिटवून घेतला असला तरी या प्रकाराची चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हायस्कूल परिसरात राहणाऱ्या ३ मजनूंची धुलाई ग्रामस्थांनी केल्याचे समजते. आई-वडिलांच्या अतिलाडाने बिघडलेल्या या मजनूंनी मुलींसमोर हिरोगिरी करीत दुचाकीचा कट मारणे, मोबाईलवर एसएमएस करणे, त्यांचा पाठलाग करणे आणि त्यांच्या घरासमोर घिरट्या घालणे या प्रकारे त्रास दिला. काही दिवस त्रास सहन केल्याने मजनूंची हिंमत वाढतच होती. अखेर या मुलींनी याची माहिती आपल्या पालकांना तसेच नातेवाइकांना दिली. हा प्रकार गंभीर असल्याने नातेवाइकांनी, तसेच इतर १० ते १५ तरुणांनी एकत्र येत यातील एका मजनूला सोबत घेऊन इतर दोघांना शाळेच्या प्रांगणात बोलावीत या प्रकाराची विचारणा केली. तसेच त्यांची जोरदार धुलाई केली. धुलाई होताच मजनूगिरीची कबुली देत असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. अखेर कोणत्याही मुलीला त्रास देणार नाही, या बोलीवर या तरुणांनी मारहाण थांबवीत तिघांना सोडले. आपला दिवटा काय दिवे लावतो, याची माहिती मजनूंच्या आई-वडिलांना मिळाल्याने त्यांनीही पोलीस ठाण्याकडे न जाता घराकडे मोर्चा वळविला. भिगवण पोलीस रोजच शाळा परिसरात रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी गस्त घालत असतात. परंतु हे रोमिओ हुशारीने पोलीस आले की लपून बसतात. पोलीस गेले की बाहेर येत पुन्हा मजनूगिरी सुरू करतात. त्यामुळे आपला मुलगा दिवसभर काय करतो, त्याची मित्रमंडळी कोण आहेत आणि शाळेच्या वेळेत शाळा परिसरात घिरट्या घालतो का, याच्यावर आई-वडिलांचे लक्ष असणे गरजेचे आहे.
रोडरोमिओंची बेदम धुलाई
By admin | Published: July 08, 2017 2:09 AM