पुणे : शहरामध्ये दिवसा आणि रात्रीसुध्दा कुत्र्यांची दहशत वाढली आहे. पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी त्यांना पकडून नसबंदी केली जाते. पालिकेची यंत्रणा आणि तीन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हे काम चालते. गेल्या तीन वर्षात यावर कोट्यवधींचा खर्च झाला असला तरी पैदास मात्र थांबलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या व्हेटरनरी विभागालाही नेमके काय करावे हे सुधरत नसल्याचे चित्र पहायला मिळते आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे, अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई, युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थांच्या यंत्रणेद्वारे भटकी कुत्री पकडण्यात येतात. त्यानंतर त्यांची नसबंदी आणि लसीकरण केले जाते. त्यानंतर ही कुत्री पुन्हा ज्या भागातून पकडण्यात आली होती; त्याच भागात सोडण्यात येतात. त्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होतच नाही. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या नसबंदीचे काम अगदी संथ गतीने सुरु आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्य मोजण्याकरिता काही वर्षांपुर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी दोन ते अडीच लाख भटकी कुत्री शहरात असावित असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यातील एक लाख कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानंतर मात्र ही प्राणी गणना झालेली नाही. शहरात वर्षाकाठी साधारणपणे १५ हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाते. दिवसाकाठी साधारणपणे ८० कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते.
======
नागरिकांकडून तक्रार आल्यास आरोग्य निरीक्षक भटकी कुत्री पकडून त्यांना डॉ. नायडू रुग्णालय किंवा मुंढव्यातील केंद्रामध्ये दाखल करतात. प्राणी संख्या नियंत्रण नियमांतर्गत (अॅनिमल बर्थ कंट्रोल रुल) त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांना अँटी रेबीज लसही दिली जाते. तीन दिवसांनंतर ज्या भागातून कुत्री पकडण्यात आली होती; तेथेच पुन्हा सोडण्यात येतात. दरमहा हजार ते दिड हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. कुत्री पकडण्यासाठी पालिकेची पाच आणि एनजीओच्या पाच अशा एकूण दहा गाड्या आहेत.
- डॉ. प्रकाश वाघ, प्रमुख, व्हेटरनरी विभाग, पुणे महापालिका
====
शहरातील उपनगरांसह मध्यवस्तीतही भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो. खाद्यपदार्थांच्या गाड्या, चायनीज, नॉन व्हेज हॉटेल्स, चिकन-मटणाची दुकाने आदींच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. यासोबतच उपनगरांना जोडून असलेल्या ग्रामीण हद्दीमधूनही कुत्री शहरात येत असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.
====
वर्ष नसबंदी
२०१६-१७ ९७०२
२०१७-१८ ११,७०७
२०१८-१९ ११,२३४
२०१९-२० १९,६३०
२०२०-२१ ९,९५२ (डिसेंबर अखेरीस)
====
नसबंदीवरील खर्च
वर्ष खर्च
२०१८-१९ ७९, १२, ६२०
२०१९-२० २,४२,१५,२१०
२०२०-२१ ४७,४३.३२० (सप्टेंबर अखेरपर्यंत)