पुणे : आजच्या जमान्यात शंभर रुपये ही तशी नगण्य रक्कम आहे. पण ती कितीही कमी असली तरी लाच ही लाच असते. अशिलाचे मॅरेज पिटिशनच्या कागदपत्राच्या नकला देण्यासाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे एका ५० वर्षांच्या वकिलांनी याबाबत तक्रार दिली होती. दुस-या एका कारवाईत निकाली काढलेल्या अर्जाची प्रत देण्यासाठी ५०० रुपये लाच घेताना शिरुरमध्ये पकडण्यात आले.महेश चंद्रकांत पंडित (वय ४७, रा. मुकुंदनगर) या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी ५० वर्षांच्या वकिलाने तक्रार केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वकिलांना त्यांच्या अशिलाचे मॅरेज पिटिशन न्यायालयात दाखल आहे. या पिटिशनच्या कागदपत्राच्या नकला मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यांना शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयातील नक्कल विभागात महेश पंडित हा कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. त्याने तक्रारदार यांना नकला देण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर त्याची पडताळणी केल्यावर पंडित याने तक्रारदाराला या नकला देण्यासाठी शंभर रुपयांची लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला शंभर रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भूकरमापकास पाचशे रुपयांची लाच घेताना पकडलेहिस्सेवारीची नोंद करण्यासाठी शिरुर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भूकरमापकास पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. संदीप रोडे (वय ३९) असे या भूकरमापकाचे नाव आहे़ तक्रारदार यांनी त्यांंच्या भावाच्या हिस्सेवारीची नोंद करण्यासाठी शिरुरच्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता़ हा अर्ज निकाली काढला होता़ या अर्जाची प्रत रेकॉर्ड रुममधून काढून देण्यासाठी संदीप रोडे यांनी ५०० रुपये लाच मागितली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करुन शिरुर येथील भूमिअभिलेखा कार्यालयात सापळा रचला व संदीप रोडे यांना पकडण्यात आले.अशा प्रकारे कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. लाच ही किती रुपयांची आहे, हे न पाहता आमच्याकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी करून कारवाई केली जाते. संबंधित लिपिक नेहमी लाचेसाठी त्रास देतो, असे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यामुळे आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करीत असते, असे लाचलुचपत प्रतिबधंक विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितले.
नक्कल देण्यासाठी लाच घेणारे लिपिक, भूमापक जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 8:59 PM