पुणे : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे लेखा परीक्षण झाल्यानंतर संबंधित ऑडिटरला लाच देण्यासाठी चक्क कार्यालयात वर्गणी गाेळा करण्यात आली. हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईतून समोर आला आहे. एका पर्यवेक्षिकेने आपल्याच समकक्ष पर्यवेक्षिकेला चार हजार रुपयांची लाच घेताना पकडून दिले.
विद्या गजानन सोनवणे (वय ४९) असे अटक केलेल्या पर्यवेक्षिकेचे नाव आहे. ही कारवाई भोरमधील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प येथे मंगळवारी करण्यात आली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, भोरमधील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे लेखा परीक्षण केले होते. हे लेखा परीक्षण करण्यासाठी आलेल्या ऑडिटरला पैसे देण्यासाठी कार्यालयात वर्गणी काढण्यात आली. पर्यवेक्षिका सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे तुझ्या वाट्याला चार हजार रुपये आले आहेत. ते देण्याची मागणी केली.
याबाबत तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी १३ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यात विद्या सोनवणे यांनी लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यानंतर भोर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताना सोनवणे रंगेहाथ पकडण्यात आले. भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करीत आहेत.