वडगाव मावळ: भंगार दुकान बंद करण्यास थांबविण्यासाठी साते (ता.मावळ) ग्रामपंचायतीच्या सरपंच व एका सदस्यांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने (ACB Pune) अटक केली. ही रविवारी (दि.३१) शिवराज हॉटेलच्या पाठीमागे कान्हे फाटा (ता. मावळ) येथे कारवाई केली.
सरपंच संतोष पोपट शिंदे व सदस्य ऋषींनाथ मारुती आगळमे यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथक पोलीस निरीक्षक भारत साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे भंगारचे शेड साते ग्रामपंचायत हद्दीत उभारले होते. त्या भंगार दुकान शेड बाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार अर्ज दिला होता. दुकान बंद न करण्यासाठी सरपंच संतोष शिंदे व सदस्य ऋषीनाथ आगळमे यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोडी अंती एक लाख रुपयांची रविवारी (दि.३१) कान्हे फाटा येथील हॉटेल शिवराज च्या मागे लाच घेताना रंगेहात पकडले.
वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंके, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस निरीक्षक शरद गोरडे, पोलीस कर्मचारी भूषण ठाकर, दिनेश माने, रियाज शेख, नागनाथ माळी, दीपक दिवेकर आदींनी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंके करत आहेत.