चाकण (पुणे) : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर वारसाचे नाव दिसण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गावकामगार तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वासुली ( ता. खेड ) तलाठी कार्यालयात अटक करण्यात आली आहे.
एकोणतीस वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून गावकामगार तलाठी सतिश संपतराव पवार (वय ५२) याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित शेतजमिनीचा ऑनलाईन सात-बारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसत नसल्याने त्यांचे ऑनलाईन नाव दिसणेकरीता वासुली तलाठी कार्यालय येथील तलाठी लोकसेवक सतीश पवार यांची भेट घेतली असता, लोकसेवक सतीश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे ३० हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता,(दि. १७/५ ) रोजी लोकसेवक सतीश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे वडिलोपार्जित शेतजमिनीचा ऑनलाईन सात-बारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागणी करुन, (दि. १०/०६/२०२४ ) रोजी लोकसेवक सतीश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडून रुपये २० हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलिस उपआयुक्त/पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.