पुणे : गुंतवणुकीची अडकलेली रक्कम व्याजासहित परत देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदाराला पावणे दहा लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दीपक राकेश शर्मा (वय ३१, रा. नोएडा) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एक अनोळखी महिला व आठ मोबाईल क्रमांकधारक आणि चार बँक खातेधारक अशा एकूण तेरा जणांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोहगाव येथील एका रहिवाशाने फिर्याद दिली आहे. ही घटना फेब्रुवारी २०१९ ते मे २०२० दरम्यान ऑनलाईन घडली.
फिर्यादी यांनी एका कंपनीत चार वर्षे मुदतीवर एक लाख रुपये गुंतवले होते. ही कंपनी बंद पडल्याने, त्यातील गुंतवलेली रक्कम परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादींना फोन केले आणि गुंतवणुकीची रक्कम व्याजासहित परत देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँक खात्यांवर वेळोवेळी रक्कम भरायला लावून ९ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. हा गुन्हा करण्यामागे मोठ्या टोळीचा हात असण्याची शक्यता आहे. याबाबत तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.