पुणे : शिरूर येथील २० गुंठे जमिनीचे एनए (अकृषिक) करून देण्यासाठी अडीच लाख रूपयांची लाच मागणाऱ्या पुणे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील (शिरूर विभाग) लिपीकाविरूध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल दिगंबर घोडके (वय ४९) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. शिरूर येथील २० गुंठे जमीन एनए होण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केलेला होता. हे काम करून देण्यासाठी घोडके याने तक्रारदारांकडे अडीच लाख देण्याची मागणी केली. एवढी मोठी लाच देणे शक्य नसल्याने घोडके याच्याविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार दाखल केली.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीमध्ये घोडके याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरूध्द १०६४ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रधान यांनी केले आहे. (वार्ताहर)
लाचखोर लिपिकास अटक
By admin | Published: November 05, 2014 11:14 PM