विवेक भुसे
पुणे : सरकारी काम करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) सापळा रचून लाच घेताना पकडले जाते. त्याची माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते. अशा लाचखोरांना त्या-त्या खात्याने तातडीने निलंबित करणे अपेक्षित असते. मात्र, अनेक शासकीय विभागातून अशा लाचखोरांना अभय दिले जाते. राज्यभरातल्या अशा १६६ लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्यानंतरही त्यांचे निलंबन न झाल्याने त्यांची खुर्ची अद्याप कायम आहे.
त्यामध्ये १५ वर्ग १ चे अधिकारी, १३ वर्ग २ चे अधिकारी, ८४ वर्ग ३ चे आणि ५ वर्ग ४ चे कर्मचारी व ४९ इतर यांचा समावेश आहे. लाच घेतली असतानाही अजूनही खुर्चीवर कायम असलेल्यांची शिक्षण विभागात सर्वाधिक ४४ जण असून, त्या खालोखाल ३१ जण ग्रामविकास खात्याचा समावेश आहे. महसूल, नोंदणी विभागातील सोळा जणांचा समावेश आहे.
१६६ जणांच्या निलंबनाचा मुहूर्त सापडेना
लाच घेतल्यानंतर अनेक प्रकरणात संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली गेली. त्यातील काही जणांनी इतरांच्या माध्यमातून लाच घेतली असल्याने त्यांना अटक झाली नाही. तरीही त्यांचा अहवाल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. असे असेल तरी वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालताना दिसत असून, राज्यातील अशा १६६ लाचखोरांना निलंबित करण्याचा मुहूर्त अद्याप या अधिकाऱ्यांना सापडलेला नाही.
महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर
शिक्षण विभागात सर्वाधिक ४४ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी निलंबित न झाल्याने अजूनही आपल्या पदावर कार्यरत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुलै २०१४ मध्ये आग्रीपाडा येथील मुख्याध्यापक, क्लार्कवर कारवाई केली होती. तसेच ऑगस्ट २०१४ मध्ये एक सापळा कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्याकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. शिक्षण विभागातील लाचखोरांवर कारवाईचे अधिकार असलेल्यांपैकी शिक्षण संचालकांकडे अधिकार असणारी सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात दिसून येते.
राज्यभरात आतापर्यंत ७२० सापळा कारवाया झाल्या. त्यात महसूल विभाग आघाडीवर आहे. राज्यात १६८ कारवाया या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर झाल्या आहेत. त्याखालोखाल पोलीस विभागात १६५ कारवाया झाल्या आहेत.
सापळा प्रकरणात ज्या आरोपींविरुद्ध कारवाई केली. त्यापैकी अद्यापपर्यंत निलंबित न केलेले जिल्हानिहाय आरोपी पुढीलप्रमाणे -
मुंबई -१६
ठाणे - २४
पुणे - १०
नाशिक- २
नागपूर - ४९
अमरावती - १९
औरंगाबाद - १८
नांदेड - २८