चाकण : चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आशिष नारायण जाधव यास आज (दि. ७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत या लाचखोर पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यातच गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती. पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील ज्ञानेश्वर शंकर जंबुकर यांच्यावर ९ जुलै रोजी मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जंबुकर यांना न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतरही अटक करण्याची भीती दाखवत या अधिकाऱ्याने पैशांची मागणी केली होती. त्याबाबत संबंधित पोलीस उपनिरीक्षक यांनी अटक न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागितली होती. त्यातील दहा हजारांची रक्कम आज देण्याचे ठरविण्यात आले होते. दरम्यान, जंबुकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आज सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्यातच ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद हातोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांस रंगेहाथ ताब्यात घेतले. जाधव यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ( वार्ताहर )
लाचखोर उपनिरीक्षकास चाकणमध्ये अटक
By admin | Published: October 08, 2014 5:26 AM