पुणे : दोन्ही घरातील लोकांच्या सहमतीने लग्न ठरले. दोन महिन्यांपूर्वी सुपारीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर १ मे रोजी लग्नाची तारीख ठरली. लग्नाची सर्व तयारी झाली असताना हळदीच्या आदल्या दिवशी नववधु घरातून पळून गेली. त्यामुळे सर्व पाहुण्यांमध्ये बदनामी झाल्याने वरपित्याने पोलिसांकडे धाव घेत नववधु, तिचे आईवडिल, भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिघी येथील ६३ वर्षाच्या वरपित्याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील एका तरुणीचे फिर्यादी यांच्या मुलाबरोबर विवाह निश्चित करण्यात आला होता. लग्नाची सर्व बोलणी करुन २७ मार्च रोजी सुपारीचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर नववधुच्या सहमतीने १ मे रोजी विवाहाची तारीख ठरविण्यात आली. फिर्यादी यांनी लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी ८० हजार, लग्नपत्रिकेसाठी ७ हजार, लग्न जमविणे, लग्न विधीचे कार्यक्रमासाठी ७५ हजार रुपये असा १ लाख ६२ हजार रुपयांचा खर्च केला. लग्नाची सर्व तयारी झाली होती.
२९ एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यासाठी वराकडील सर्व नातेवाईक जमले होते. असे असताना आदल्या दिवशी २८ एप्रिल रोजी मुलगी पळून गेली. तिच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याची माहिती मिळाल्याने २९ एप्रिलचा हळदीचा व त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यामुळे सर्व पाहुण्यांमध्ये बदनामी झाल्याने वरपित्याने थेट पोलीस ठाणे गाठले व बदनामी व फसवणूकीची तक्रार दिली. मुलीचा पोलीस शोध घेत असून पोलीस उपनिरीक्षक कोल्लुरे तपास करीत आहेत.